Raju Srivastava: राजू यांच्या निधनावर ढसाढसा रडली पत्नी; म्हणाली “त्यांनी खूप संघर्ष केला, पण..”
राजू यांच्याविषयी बोलताना पत्नीला अश्रू अनावर; शेवटच्या क्षणापर्यंत सोडली नव्हती आशा
कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांनी वयाच्या 58 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. 10 ऑगस्ट रोजी त्यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तब्बल 42 दिवसांच्या संघर्षानंतर त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांना आज (बुधवारी) सकाळी 10.20 वाजता मृत घोषित करण्यात आलं. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी शिखा (Shikha Srivastava) ढसाढसा रडल्या.
10 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केल्यानंतर राजू बरेच दिवस शुद्धीवर आले नव्हते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. रुग्णालयात दाखल केल्यापासून ते व्हेंटिलेटरवरच होते.
एका वेब पोर्टलशी बोलताना पत्नी शिखा यांना अश्रू अनावर झाले. “मी सध्या व्यक्तच होऊ शकत नाही. मी काय बोलू हेच मला कळत नाहीये. त्यांनी खूप संघर्ष केला. मी खरोखरच आशा करत होते आणि त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. पण असं झालं नाही. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आशा सोडली नव्हती. मी एवढंच म्हणेन की ते खरे लढवय्ये होते.”
राजू यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. राजू यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची पत्नी शिखा त्यांच्या पाठीशी उभी राहिली. राजूच्या वाईट काळातही शिखाने त्यांची साथ दिली.
राजू यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि पियुष गोयल यांच्यासह अनेक सेलिब्रिटी, चाहते आणि राजकारण्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. राजू यांच्या पार्थिवावर गुरुवारी 22 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नवी दिल्लीतील निगमबोध घाटावर सकाळी 9.30 वाजता अंत्यविधी पार पडतील.