महेश बाबू जे म्हणाला ते योग्यच; साऊथ फिल्म इंडस्ट्री बॉलिवूडपेक्षा अधिक कार्यक्षम- दलिप ताहिल
"बॉलिवूडला मी परवडू शकणार नाही", असं त्याने म्हटलं होतं आणि त्याचं हे विधान चांगलंच चर्चेत आलं होतं. बॉलिवूडला कमी लेखल्याबद्दल त्याच्यावर टीकासुद्धा झाली होती. मात्र आता बॉलिवूडमधीलच दिग्गज अभिनेत्याने त्याला पाठिंबा दिला आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबूने (Mahesh Babu) जेव्हा त्याच्या बॉलिवूड (Bollywood) पदार्पणाबाबत वक्तव्य केलं, तेव्हा सोशल मीडियावर विविध मतमतांतरे व्यक्त झाली. “बॉलिवूडला मी परवडू शकणार नाही”, असं त्याने म्हटलं होतं आणि त्याचं हे विधान चांगलंच चर्चेत आलं होतं. बॉलिवूडला कमी लेखल्याबद्दल त्याच्यावर टीकासुद्धा झाली होती. मात्र आता बॉलिवूडमधीलच दिग्गज अभिनेत्याने त्याला पाठिंबा दिला आहे. “माझ्या मते तेव्हा महेश बाबूने असं म्हटलं की हिंदी चित्रपटांसाठी तो परवडू शकणार नाही, तेव्हा त्याला मानधनापेक्षा अधिक कामाच्या नैतिकतेबद्दल बोलायचं असेल. मी त्याच्याशी पूर्णपणे सहमत आहे”, असं ट्विट अभिनेते दलिप ताहिल (Dalip Tahil) यांनी केलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या ट्विटमागील अर्थसुद्धा समजावून सांगितलं.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची कामाची पद्धत-
“कामाच्या नैतिकतेबद्दल मी जे म्हटलं होतं, त्या मतावर मी अजूनही ठाम आहे. महेश बाबूने जे म्हटलं त्यात मानधनाचा विषय थोडाफार येतच असेल. पण त्याच्या म्हणण्यामागे दुसऱ्या गोष्टीही आहेत. तुम्हाला हे समजलं पाहिजे की महेश बाबू हा देशभरातला मोठा स्टार आहे. फक्त तेलुगू इंडस्ट्रीपुरतं त्याचं स्टारडम मर्यादित नाही. तो मेगा स्टार आहे. मी आताच पवन कल्याण यांच्यासोबत एका तेलुगू चित्रपटात काम केलं आणि त्यांची कामाची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे. तिथले निर्माते हे स्वत:ला चित्रपटासाठी पूर्णपणे वाहून घेतात. ते स्वत: सेटवर हजर असतात. एखाद्या कॉर्पोरेट बोर्ड मिटींगप्रमाणे ते ऑफिसमध्ये बसून चित्रपटासंबंधित निर्णय घेत नाहीत. शूटिंगच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सोबत असतात. त्या दृष्टीने विचार केला असता, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ही खूपच नियोजनबद्ध आहे. जे चित्रपट बनवत आहेत, तेच त्याबद्दल निर्णय घेऊ शकतात. मुंबईतही ही गोष्ट आता हळूहळू सुधारू लागली आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर, कामाची नैतिकता अजूनही ढासळलेली आहे,” असं दलिप ताहिल म्हणाले.
दलिप यांचं ट्विट-
“In my humble opinion, when @urstrulyMahesh (south megastar) says Hindi movies cannot afford him!!!he is most likely referring to the work ethic, where I completely agree with him” more strength to Mahesh Babu”??? . .#maheshbabu pic.twitter.com/oBcGPYK0Xd
— Dalip Tahil ?? (@daliptahil) May 15, 2022
बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील फरक
साऊथ इंडस्ट्रीच्या कामाच्या पद्धतीविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, “वेळेवर स्क्रीप्ट तयार नसणं, शेड्युल बदलणं हे इथल्या चित्रपटांच्या बाबतीत खूप सामान्य आहे, पण साऊथमध्ये हे होत नाही. ज्यांच्या हाती प्रोजेक्ट आहे, ते एका वेळी एकच प्रोजेक्ट हातात घेऊन त्यावर लक्ष केंद्रीत करतात. यामुळे खूप मोठा फरक पडतो. गोष्टी अधिक कार्यक्षमतेने केल्या जातात. मी हिंदी फिल्म इंडस्ट्रीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत नाहीये, पण जे मी गेल्या 47 वर्षांत पाहिलंय, तेच सांगतोय. माझ्या मते, साऊथ फिल्म इंडस्ट्री ही वेळोवेळी वंगण घातलेल्या, अत्यंत सुरळीत चालणाऱ्या मशिनसारखी आहे. त्यामुळे महेश बाबूला हिंदी सिनेसृष्टीत येऊन काम करणं कठीण जाऊ शकेल.”