Fact Check: ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनसाठी राजामौलींना मिळाले इतके कोटी रुपये? काय आहे सत्य?
दिग्दर्शक राजामौलींनी ब्रह्मास्त्र या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. अनेक कार्यक्रमांमध्ये ते रणबीर कपूरसोबत दिसले होते. त्यांनी या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं होतं.
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीपासून खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटावर बरीच टीका झाली होती आणि त्यावर बहिष्कार टाकण्याचीही मागणी केली जात होती. मात्र नकारात्मक मोहिमेचा चित्रपटाच्या व्यवसायावर फारसा फरक पडलेला दिसत नाही. कारण ब्रह्मास्त्रने रिलीज झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांत चांगली कमाई केली. आता सोशल मीडियावर अशीही चर्चा होत आहे की बाहुबली फेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांनी ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनसाठी 10 कोटी रुपये घेतले आहेत.
दिग्दर्शक राजामौलींनी ब्रह्मास्त्र या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं. अनेक कार्यक्रमांमध्ये ते रणबीर कपूरसोबत दिसले होते. त्यांनी या चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं होतं. एस. एस. राजामौली हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळतो. त्यामुळे त्यांच्या प्रसिद्धीचा ब्रह्मास्त्रला फायदा व्हावा यासाठी पैसे देऊन त्यांच्याकडून प्रमोशन करवून घेतल्याचा आरोप होत आहे.
View this post on Instagram
राजामौली यांना ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनसाठी 10 कोटी रुपये मिळाल्याचं म्हटलं जात आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, या चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही. राजामौली यांनी आपल्या इच्छेनुसार ब्रह्मास्त्रचं प्रमोशन केलं आहे. खरंतर जेव्हापासून करण जोहरच्या प्रॉडक्शनने ‘बाहुबली’ या चित्रपटाचं डिस्ट्रीब्युशन केलं, तेव्हापासूनच करण आणि राजामौली यांच्यात चांगली मैत्री झाली होती. याच मैत्रीखातर त्यांनी ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनचा निर्णय घेतला.
ब्रह्मास्त्र हा चित्रपट हिंदीसोबत तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित झाला. दाक्षिणात्य भाषेतील या चित्रपटाचं प्रमोशन राजामौलींनी केलं होतं. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्या भूमिका आहेत. त्याचसोबत अभिनेता शाहरुख खान यामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे.