Dipika Chikhlia: ‘माझं चुकलं’ म्हणत रामायणातील सीतेने मागितली माफी; वादग्रस्त फोटोही केला डिलिट
"मी जे केलं, त्याबद्दल स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करत नाहीये. माझ्याकडून चूक झाली हे मी मान्य करते", असं त्या म्हणाल्या.
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ (Ramayan) या मालिकेत सीतेची (Sita) भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. दीपिका यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शाळेतल्या गणवेशातला एक फोटो पोस्ट केला होता. मात्र या फोटोवरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. या ट्रोलिंगनंतर अखेर त्यांनी तो फोटो डिलिट केला आणि ते डिलिट करण्यामागचं कारणही सांगितलं. आपल्या दोन मैत्रिणींसोबत शाळेतल्या गणवेशातला हा फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पांढरा शर्ट, स्कर्ट आणि टाय असा त्यांचा गणवेश आहे. थीम पार्टीतला हा फोटो असल्याचा अंदाज काही नेटकऱ्यांनी वर्तवला. या फोटोमध्ये दीपिका यांच्या एका हातात ड्रिंक्सचा ग्लास पहायला मिळतोय. यावरूनच नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.
याबाबत ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मला माझ्या चाहत्यांची मनं कधीच दुखवायची नाहीत. मला ट्रोल केल्याबद्दल खूप वाईट वाटतंय. माझ्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल मला वाईट वाटतंय. मला माहितीये की लोक अजूनही माझ्याकडे सीता या भूमिकेच्या नजरेतूनच पाहतात. त्यांच्यासाठी मी दीपिका नाही. लोकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मी ती पोस्ट डिलिट केली. आधीच या जगात अनेक समस्या आहेत, त्यात आणखी भर नको.”
इन्स्टा पोस्ट-
View this post on Instagram
“मी जे केलं, त्याबद्दल स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न करत नाहीये. माझ्याकडून चूक झाली हे मी मान्य करते. मी माझ्या लार्जर दॅन लाइफ प्रतिमेकडे दुर्लक्ष करण्याचा आणि मी सामान्य व्यक्ती आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करत नाहीये. मी दारू पीत नव्हते. मी कधीही दारू पीत नाही. फक्त माझ्या जुन्या मैत्रिणींसोबतची ती गेट-टुगेदर पार्टी होती”, असं त्या पुढे म्हणाल्या.
रामानंद सागर लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित ‘रामायण’ या पौराणिक मालिकेत दीपिका यांनी सीतेची भूमिका साकारली होती. 1987 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि त्यानंतर 2020 मध्ये लॉकडाउनदरम्यान ही मालिका पुन्हा टीव्हीवर प्रसारित करण्यात आली.