Sreejith: अभिनेत्याचं अल्पवयीन मुलींसमोर पार्कमध्ये अश्लील कृत्य; पॉक्सो कायद्यांतर्गत पोलिसांनी केली अटक
मुलींनी तक्रार केल्यानंतर आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्रिशूर पश्चिम पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. कारच्या क्रमांकावरून पोलिसांना आरोपीच्या घराचा पत्ता मिळाला.
मल्याळम अभिनेता श्रीजीत रवी (Sreejith) याला गुरुवारी (7 जुलै) केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातून POCSO कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. शाळेतील अल्पवयीन मुलींसमोर अश्लील कृत्य (sexual abuse) केल्याप्रकरणी श्रीजीत रवीला पॉक्सो कायद्याच्या कलम 11 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. श्रीजीत हा लोकप्रिय अभिनेता टीजी रवी (T. G. Ravi) यांचा मुलगा आहे. 2016 मध्ये अशाच गुन्ह्यात श्रीजीतला अटक करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी सर्वसामान्य कारणावरून गुन्हा नोंदवल्यानंतर त्याला सोडून दिलं होतं. 14 आणि 9 वयोगटातील अल्पवयीन मुलींवर 4 जुलै रोजी त्रिशूरमधील एका उद्यानात लैंगिक अत्याचार केल्याचा श्रीजीतवर आरोप आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. आरोपी व्यक्ती काळ्या रंगाच्या कारमधून आल्याचं दोन्ही मुलींनी पोलिसांना सांगितलं होतं.
मुलींनी तक्रार केल्यानंतर आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्रिशूर पश्चिम पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. कारच्या क्रमांकावरून पोलिसांना आरोपीच्या घराचा पत्ता मिळाला. त्यानंतर आरोपीच्या घरी पोहोचल्यानंतर पोलिसांना ते अभिनेता श्रीजीत रवीचं घर असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला.
४६ वर्षीय श्रीजीत हा व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनीअर असून त्याच्याकडे मॅनेजमेंटची पदवी आहे. श्रीजीतने मल्याळम चित्रपटसृष्टीत 2005 साली ‘मायुखम’ चित्रपटाद्वारे पदार्पण केलं. त्याच वर्षी 100 दिवस चाललेल्या ‘चंथुपोट्टू’ चित्रपटातून त्याला मोठा ब्रेक मिळाला. ‘पुन्यालन अगरबत्तीस’ या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला 2013 मध्ये सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा SIIMA पुरस्कार मिळाला. श्रीजीतने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.