Pushkar Jog: “दुसऱ्याचं चांगलं झालं नाही पाहिजे हाच विचार ते करतात”; मराठी इंडस्ट्रीबाबत पुष्कर जोगने मांडली खदखद
अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीत एकता नसल्याचं म्हटलंय. दाक्षिणात्य आणि इतर चित्रपटसृष्टीत मराठीच्या तुलनेत अधिक एकता आहे, असं मत पुष्करने मांडलंय.
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड आणि दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील (South Film Industry) फरकाबद्दलचा वाद सुरू आहे. त्यातच आता मराठी चित्रपटसृष्टीचीही (Marathi film industry) भर पडली आहे. अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीत एकता नसल्याचं म्हटलंय. दाक्षिणात्य आणि इतर चित्रपटसृष्टीत मराठीच्या तुलनेत अधिक एकता आहे, असं मत पुष्करने मांडलंय. “इतर फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांमध्ये एकता दिसून येते. पण मराठी सिनेसृष्टीत ती एकता नाही. इथे लोक कौतुक करण्यापेक्षा टीकाच अधिक करतात. एखाद्याला मराठी इंडस्ट्रीत काही चांगलं करायचं असेल तर त्याची साथ देणारे खूप कमी असतात”, असं तो म्हणाला.
काय म्हणाला पुष्कर जोग?
“लॉबी आणि ग्रुपिज्म हे सगळीकडेच आहे. त्यावर मात करत तुम्हाला पुढे जावं लागतं. पावनखिंड या चित्रपटाने चांगलं यश मिळवलं होतं. पण त्याच्या यशाचं कौतुक ना मीडियाने किंवा ना फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी केलं. त्यांना ईर्षा आहे का? जेव्हा मी स्वत: त्या चित्रपटाविषयी पोस्ट लिहिली, तेव्हा चित्रपटातील कोणत्याच कलाकाराने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. तो चित्रपट खरंच आवडला म्हणून त्यातील सर्व कलाकारांना टॅग करत मी ती पोस्ट लिहिली होती. हे असंच होतं. इंडस्ट्रीत एकताच नाही. इथे लोकांना याचीच जास्त काळजी असते की दुसऱ्याचं कसं चांगलं नाही झालं पाहिजे. आधी मी असं काही मोकळेपणाने बोलायला घाबरायचो, पण आता नाही”, असं पुष्कर म्हणाला.
इन्स्टा पोस्ट-
View this post on Instagram
मराठी इंडस्ट्रीला आणि त्यातील कलाकारांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीविषयीही पुष्कर बोलला. “ओटीटी प्लॅटफॉर्म्स किंवा सॅटेलाइटकडून आम्हाला जी किंमत मिळते, ती खूपच कमी असते कारण आम्ही मराठी आहोत. हे असं का आहे? प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणण्यासाठी काहीतरी खूप मोठं करण्याची गरज मराठी इंडस्ट्रीला आहे. 200-300 कोटींची कमाई करणारा, जबरदस्त कथानक असलेला चित्रपट हवा. हे करण्यासाठी सर्वांत आधी इंडस्ट्रीतील लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्याच कंटेटचं आधी कौतुक करावं लागेल,” असं मत त्याने मांडलं.