‘प्रीत अधुरी’ चित्रपटाला मिळाली शिक्षिकांची साथ; सांभाळली दिग्दर्शन अन् निर्मितीची धुरा
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियांकाने केले असून ती पेशाने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका (Teacher) आहे. तर या चित्रपटाची (Marathi Movie) निर्मिती स्वप्नाली पवार यांनी केली असून त्याही शिक्षिका आहेत.
‘मुलगी शिकली, प्रगती झाली’, असे महाराष्ट्र सरकारचे ब्रीदवाक्य सरकारच्या शिक्षणाबद्दलची आस्था दर्शविते. मुलगी शिकल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात अनेक महिला आघाडीवर दिसताहेत आणि त्यात मनोरंजनसृष्टीही मागे नाही. ‘प्रीत अधुरी’ (Preet Adhuri) नावाचा एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियांकाने केले असून ती पेशाने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका (Teacher) आहे. तर या चित्रपटाची (Marathi Movie) निर्मिती स्वप्नाली पवार यांनी केली असून त्याही शिक्षिका आहेत. इतकेच नव्हे तर या दोन महिला शिक्षिकांच्या पंखांना बळ देण्यासाठी म्हणजे आर्थिक पंख देण्यासाठी अजून एक शिक्षिका पुढे सरसावल्या त्या म्हणजे जिल्हा परिषद शिक्षिका बेबीताई वाडकर. या तीन महिला म्हणजे महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण आहे.
या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद शिव ओंकार, प्रकाशमणी तिवारी, संदीप मिश्रा आणि महादेव साळोखे यांनी लिहिली असून नावावरूनच समजते की ‘प्रीत अधुरी’ हा चित्रपट म्हणजे एक प्रेमकथा असणार. अर्थातच या सिनेमाच्या रोमँटिक कथेत मनोरंजनाचा इतर मसालाही बघायला मिळेल. या चित्रपटाचा जॉनर फॅमिली ड्रामा-रोमान्स-ऍक्शन-सस्पेन्स-थ्रिलर असा असून चित्रपटातून अनेक ट्विस्ट्स आणि टर्न्स बघायला मिळतील. या चित्रपटाचे संगीत म्हणजे याचा प्राण असून त्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे शिव ओंकार – राजेश घायल या संगीतकारद्वयीने. तर गीते लिहिली आहेत शिव ओंकार व शशिकांत पवार यांनी. सुप्रसिद्ध गायक जावेद अली, कुणाल गांजावाला, साधना सरगम, शाहिद मल्ल्या, रितू पाठक, खुशबू जैन आणि सुदेश भोसले यांनी पार्श्वगायन केले आहे.
‘प्रीत अधुरी’ या चित्रपटात दोन नवीन चेहरे लाँच होणार आहेत. प्रवीण यशवंत आणि प्रिया दुबे हे कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. तर संजय खापरे, मिलिंद दास्ताने, शाम निनावे, कमलेश सावंत आणि अरुण नलावडे हे या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसतील. ‘प्रीत अधुरी’चे चित्रीकरण निसर्गरम्य आशा कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि मुंबई येथे पार पडले असून हा चित्रपट आता पोस्ट प्रॉडक्शनमध्ये आहे.