Mumbai Metro 3: ‘अब मजा आयेगा…’, अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा मेट्रोची जबाबदारी सोपवताच सुमीत राघवनचं ट्विट
कुलाबा ते सिप्झ या भुयारी मेट्रो उभारणीत महत्त्वाची कामगिरी बजाविणाऱ्या अश्विनी भिडे यांच्याकडे या प्रकल्पाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. आरेतील वृक्ष तोडल्याबद्दल भिडे यांच्यावर टीका झाली होती.
राज्यात सत्ताबदल होताच नव्या सरकारने कुलाबा ते सिप्झ या मुंबई मेट्रो- 3च्या (Metro 3 project) कामाला प्राधान्य देतानाच या मेट्रोची जबाबदारी पुन्हा मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांच्याकडे सोपवली. पंतप्रधान कार्यालय आणि विदेशात प्रशिक्षण घेऊन राज्याच्या सेवेत परतलेल्या डॉ. श्रीकर परदेशी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रखडलेल्या मुंबई मेट्रो – 3 प्रकल्पाला प्राधान्य दिलं आहे. कुलाबा ते सिप्झ या भुयारी मेट्रो उभारणीत महत्त्वाची कामगिरी बजाविणाऱ्या अश्विनी भिडे यांच्याकडे या प्रकल्पाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. आरेतील वृक्ष तोडल्याबद्दल भिडे यांच्यावर टीका झाली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येताच भिडे यांची मेट्रोतून बदली करण्यात आली होती. आता त्यांची पुनर्नियुक्ती केल्यानंतर अभिनेता सुमीत राघवनने (Sumeet Raghvan) ट्विट केलं आहे. आरेतील मेट्रो कारशेडबाबत सुमीर वारंवार ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त झाला आहे. त्यामुळे भिडे यांची नियुक्ती होताच त्याने ट्विट करत आनंद व्यक्त केला.
‘येस्सस्सस्स… अब आयेगा मजा. या प्रकल्पाचा तार्किक शेवट पाहण्यासाठी तुम्ही तिथं असायला हवं होतं असं मला नेहमीच वाटत होतं. अखेर आता तिथे तुम्ही आला आहात. ही एक अत्यंत विलक्षण चाल आहे. अश्विनी भिडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई मेट्रो- 3 आणि मुंबईकरांना तुमची नेहमीच आठवण येत होती,’ असं ट्विट करत सुमीतने कारशेड आणि कर्माबद्दलचे हॅशटॅग वापरले आहेत. मेट्रो प्रकल्प रखडल्याबद्दल सुमीतने वारंवार ट्विटरच्या माध्यमातून राग व्यक्त केला होता. इतकंच नव्हे तर आंदोलकांनी नुसतं फलक घेऊन उभं राहून आणि झाडांना मिठी मारून त्यांचं प्रेम दाखवण्याऐवजी त्यांना त्यांच्या खिशातून पैसे खर्च करून काहीतरी उपयुक्त करा, असा सल्लादेखील त्याने आरेतील कारशेडला विरोध करणाऱ्यांना दिला होता.
सुमीत राघवनचं ट्विट-
Yesssss..Ab ayega mazaa. I always felt you should have been there to see the logical end of this project. Well.. THERE YOU ARE. OG is back. ?#KarmaStrikesBack That’s a fantastic move. Welcome back @AshwiniBhide .@MumbaiMetro3 and mumbaikars missed you. #CarShedWahiBanega pic.twitter.com/NaWZEp4NuR
— Sumeet Raghvan सुमीत राघवन (@sumrag) July 12, 2022
आरेतील मेट्रो कारशेडचा वाद
बहुचर्चित कुलाबा- वांद्रे – सिप्झ मेट्रो- 3चं कारशेड आरे कॉलनीमध्येच करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने गुरुवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पहिला धक्का दिला. कारशेड आरेमध्येच करण्यास सरकार तयार असल्याची भूमिका न्यायालयात मांडण्याची सूचना राज्याच्या महाधिवक्त्यांना देण्यात आली आहे. राज्यात शिवसेना- भाजप युती सरकारच्या काळात मेट्रो- 3चं कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कारशेडचं 25 टक्के कामही पूर्ण झालं होतं. मात्र, नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. या कारशेडमुळे पर्यावरणाचं नुकसान होणार असल्याचं सांगत कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग इथं करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला होता.