Subodh Bhave: “लायकी नसलेल्या राजकारण्यांच्या हाती देश उभारणीचं काम”; सुबोध भावेची सडकून टीका
"राजकारण्यांच्या हातात देश देऊन काही होणार नाही. ते काय करत आहेत, हे आपल्या समोर आहेच. म्हणूनच पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजं रोवून त्यांना देशासाठी उभं करणं गरजेचं आहे." असं तो म्हणाला.
ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचं काम दिलं आहे, अशी टीका अभिनेता सुबोध भावेनं (Subodh Bhave) केली. ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘डीईएस-प्री प्रायमरी स्कूल’तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना सुबोध भावेनं देशातील राजकारण्यांवर (Politicians) आणि राज्यपालांनी (Governor) नुकत्याच केलेल्या विधानावर सडकून टीका केली. “आपण चांगलं शिक्षण घेऊन, चांगली नोकरी कशी मिळेल, परदेशी स्थायिक कसं होता येईल याचाच विचार करत आहोत. देश निर्माण करायचा असेल, तर पुढील पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रुजवावा लागेल”, असंही तो म्हणाला.
पुण्यातील या कार्यक्रमात सुबोध भावेच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांकडून नृत्य नाटिका सादर करण्यात आली. या नाटिकेत जवळपास 250 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना सुबोध म्हणाला, “राजकारण्यांच्या हातात देश देऊन काही होणार नाही. ते काय करत आहेत, हे आपल्या समोर आहेच. म्हणूनच पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजं रोवून त्यांना देशासाठी उभं करणं गरजेचं आहे. नोकरदार तयार व्हावेत यासाठी इंग्रजांनी आपल्या देशात शिक्षणव्यवस्था आणली. पण आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत. म्हणूनच मुंबई, महाराष्ट्रातून काही लोकं निघून गेले, तर पैसेच राहणार नाही, अशी वक्तव्यं करण्यास काही राजकारणी धजावतात.”
View this post on Instagram
यावेळी मुलांना शिकवल्या जाणाऱ्या विविध गोष्टींवरही सुबोध भावेनं आपलं मत मांडलं. “हल्ली आपण मुलांना चित्रपटांतील हिंदी किंवा मराठी गाण्यांवर नाचायला सांगतो. एखाद्या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग म्हणायला सांगतो. पुष्पा या चित्रपटातील डायलॉगचं खूळ आलं होतं. पण ते करून देश घडणार नाही. त्याऐवजी मुलांना जर राष्ट्रपुरुषांचे विचार सांगितले, ते सादर करायला सांगितले, तर त्यांच्यामध्ये देशभक्ती निर्माण होईल”, असंही सुबोध म्हणाला.