Jhimma: आयुष्य भरभरुन जगायला शिकवणारा ‘झिम्मा’ आता टेलिव्हिजनवर पाहता येणार
संसाराच्या रहाटगाड्यातून बायकांना स्वत:साठी असे खूप कमी क्षण मिळतात. घरच्या आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:साठी जगायचंच राहून जातं. मात्र अशात एखादी छानशी ट्रीप प्लॅन होते आणि आयुष्यच बदलून जातं.
‘पावनखिंड’ सिनेमाच्या दमदार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरनंतर प्रवाह पिक्चर (Pravah Picture) ‘झिम्मा’ (Jhimma) हा सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. संसाराच्या रहाटगाड्यातून बायकांना स्वत:साठी असे खूप कमी क्षण मिळतात. घरच्या आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:साठी जगायचंच राहून जातं. मात्र अशात एखादी छानशी ट्रीप प्लॅन होते आणि आयुष्यच बदलून जातं. अशाच एका भन्नाट ट्रीपमध्ये (Trip) आयुष्य नव्याने गवसलेल्या सात स्त्रियांची गोष्ट झिम्मा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं वेगळेपण म्हणजे यातली भन्नाट पात्रं. प्रत्येकालाच आपली आई, आपली मुलगी, आपली पत्नी, आपली आजी आणि आपली मैत्रीण भेटल्याचा आभास नक्कीच होईल. सिनेमातल्या पात्रांसोबत घरबसल्या प्रेक्षकांनाही एका छान सहलीचा आनंद लुटता येईल.
सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्रींनी या सिनेमात आपल्या जबरदस्त अभिनयाने सप्तरंग भरले आहेत. तर सिद्धार्थ चांदेकरचा हजरजबाबीपणा सिनेमात वेगळीच रंगत आणतो. हेमंत ढोमेने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहात यशस्वी 100 दिवस पूर्ण केले होते. बऱ्याच वर्षांनी मराठी चित्रपटाने अशी गौरवास्पद कामगिरी केली आहे. अतिशय कठीण काळात प्रेक्षकांना सिनेमागृहात आणून 15 कोटींची कमाई करणारा हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना एकाच सिनेमात पहायला मिळणार आहे. ‘झिम्मा’च्या यशाबद्दल बोलताना निर्माती श्रिती जोग म्हणाली होती, “लॉकडाऊननंतर मराठी चित्रपटांचं काय होणार, अशी नकारात्मक चर्चा सुरू असताना झिम्मा प्रदर्शित करण्याचं धाडस केलं. मुख्य बाब म्हणजे हा चित्रपट लॉकडाऊनच्यानंतर चित्रपटगृहांची दारं उघडणारा चित्रपट ठरला. बॉलिवूड हॉलीवूडचे मोठे चित्रपट शर्यतीत असतानाही तीन महिन्यांहून अधिक काळ ‘झिम्मा’ चित्रपटगृहांमध्ये टिकून राहिला.” आयुष्य भरभरुन जगायला शिकवणाऱ्या झिम्मा सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिनज प्रीमियर येत्या रविवारी म्हणजेच 26 जूनला दुपारी 1 वाजता प्रवाह पिक्चरवर होणार आहे.