Video: हास्याचा धुमाकूळ घालत ‘झोलझाल’चा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात 22 कलाकारांची मांदियाळी
कलाकारांनी घातलेला गोंधळ ट्रेलर (Trailer) पाहून चित्रपटाची उत्सुकता वाढवणारा आहे. झोलझाल या चित्रपटात तब्बल 22 कलाकारांनी मिळून काय गोंधळ घातलाय हे येत्या 1 जुलैला रसिक प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळेल.
दोन वर्ष अंधारात काढलेल्या कोरोनाच्या काळ्याकुट्ट काळानंतर सर्वच क्षेत्रांनी जोर धरला आहे. चित्रपटसृष्टी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झालेली असताना, प्रेक्षकांना मनमुरादपणे हसायला लावण्यास अमोल लक्ष्मण कागणे (Amol Kagne) आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत ‘झोलझाल’ (ZolZaal) हा चित्रपट येत्या 1 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील हास्याची मेजवानी कशी रंगणार याची झलक नुकतीच चित्रपटाच्या ट्रेलरमधुन पाहायला मिळाली. या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता अधिक ताणली गेली असून हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणार यांत शंकाच नाही. कलाकारांनी घातलेला गोंधळ ट्रेलर (Trailer) पाहून चित्रपटाची उत्सुकता वाढवणारा आहे. झोलझाल या चित्रपटात तब्बल 22 कलाकारांनी मिळून काय गोंधळ घातलाय हे येत्या 1 जुलैला रसिक प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळेल.
‘झोलझाल’ चित्रपटात विविधांगी भूमिका साकारलेल्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळतेय. या चित्रपटातील गाणी आणि चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर आधीच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, अंकुर वाढवे, विश्वजित सोनी, श्याम मसलकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे सिनेकलाकार दिसणार आहेत.
पहा ट्रेलर
दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असून चित्रपटाची निर्मिती गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना जी अग्रवाल यांनी केली आहे. तर सहनिर्माते म्हणून रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल यांनी जबाबदारी पेलली आहे. चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून सारिका गुप्ता आणि स्वप्निल गुप्ता यांनी बाजू सांभाळली. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता लिखित आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी प्रफुल-स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी उत्तमरित्या पेलली आहे. मनसेचे अमेय खोपकर हे चित्रपटाचे वितरक आहेत.