Mumbai: काम मिळवून देण्याचं आश्वासन देत अभिनेत्रीचं लैंगिक शोषण करणाऱ्या स्टॉक ब्रोकरला अटक
अंधेरीतल्या (Andheri) एका हॉटेल रुममधून आरोपीला अटक करण्यात आली. अभिनेत्रीला त्याने आधी हॉटेलमध्ये डिनरसाठी आमंत्रित केलं आणि त्यानंतर त्याने हॉटेल रुममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
एका स्ट्रगलिंग अभिनेत्रीला काम देण्याचं आश्वासन देऊन तिचं लैंगिक शोषण करण्याच्या आरोपाखाली एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी जिग्नेश मेहता (Jignesh Mehta) या शेअर ब्रोकर आणि ट्रेडरला अटक केली. अंधेरीतल्या (Andheri) एका हॉटेल रुममधून आरोपीला अटक करण्यात आली. अभिनेत्रीला त्याने आधी हॉटेलमध्ये डिनरसाठी आमंत्रित केलं आणि त्यानंतर त्याने हॉटेल रुममध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. “मी बऱ्याच बॉलिवूड निर्मात्यांना (Bollywood Producers) ओळखतो आणि त्यांच्याशी संपर्क साधून तुला काम मिळवून देईन”, असं आश्वासन त्याने अभिनेत्रीला दिलं होतं. अटकेनंतर जिग्नेशला कोर्टात हजर केलं असता त्याला जामिन मंजूर करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाकडे गंभीररित्या पाहिलं नाही आणि त्यांनी योग्य ती कलमं न लावल्याने आरोपीला जामिन मंजूर झाल्याचा आरोप 25 वर्षीय पीडित अभिनेत्रीने केला आहे. याविरोधात कोर्टात धाव घेणार असल्याचं तिने स्पष्ट केलं.
जिग्नेश मेहताला भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354 ब आणि 506 अंतर्गत अटक करण्यात आली होती. याप्रकरणी एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सतिश गायकवाड म्हणाले, “लैंगिक शोषणाचा प्रयत्न करणाऱ्या जिग्नेश मेहताला हॉटेलच्या रुममधून अटक करण्यात आली होती.”
पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटलं, “आपण बॉलिवूडमधल्या चांगल्या निर्मात्यांना ओळखतो आणि त्याआधारे काम मिळवून देऊ शकतो असं आश्वासन देत मेहताने मला शुक्रवारी अंधेरीतल्या एमआयडीसी इथल्या एका हॉटेलमध्ये डिनरसाठी बोलावलं होतं. यावेळी हॉटेल रुममध्ये त्याचा एक मित्रसुद्धा होता. रुममध्ये त्याने माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मी ओरडताच हॉटेलमधील स्टाफ माझ्या मदतीला धावून आला.”