“‘पेट पुराण’मुळे माझ्यातली भीती गेली”; सई ताम्हणकरने सांगितला अनुभव
नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्राणीप्रेमींकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. यामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) अदितीच्या भूमिकेत आहे.
सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘पेट पुराण’ (Pet Puraan) ही नवी सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. घरातील पाळीव प्राणी (pets) हे जणू स्पंजासारखे असतात. घरातील सर्व प्रकारचे दु:ख आणि नकारात्मक दूर करून ते घरात प्रसन्न वातावारण निर्माण करतात. अशाच एका प्राण्याची कथा ‘पेट पुराण’मध्ये दाखवण्यात आली आहे. महाराष्ट्रीयन पार्श्वभूमीवर आधारित या सीरिजमध्ये अतुल आणि अदिती या जोडप्याने दत्तक घेतलेले पाळीव प्राणी बाकू नावाची मांजर व व्यंकू नावाचा कुत्रा यांची हलकी-फुलकी कथा दाखवण्यात आली आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याला प्राणीप्रेमींकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. यामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) अदितीच्या भूमिकेत आहे. विशेष म्हणजे वास्तविक जीवनात सईला पाळीव प्राण्यांची खूप भीती वाटते.
”मला एक अभिनेत्री म्हणून पाळीव प्राण्याच्या पालकाची भूमिका साकारण्याबाबत खात्री नव्हती. कारण पाळीव प्राण्यांशी भावनिकदृष्ट्या किती मिसळून जाईन हे माहीत नव्हतं. पण आम्ही चित्रीकरणाला सुरूवात करताना पाळीव प्राणी मला माझ्या मुलांसारखेच वाटले आणि काम करताना ते फक्त कामासारखं वाटलं नाही. त्यांच्यामागून धावणं आणि नेहमी माझ्यासोबत असण्याचा अनुभव उत्तम होता. खरंतर, मी कधीकधी ते अवतीभोवती असण्याला मिस करायचे. मला खात्री आहे की, ही सीरिज पाहिल्यानंतर प्रेक्षकांना त्यांच्या स्वत:च्या पाळीव प्राण्यांसोबतचे अनुभव आठवतील. मला आशा आहे की आमची सीरिज अधिकाधिक लोकांना पाळीव प्राणी दत्तक घेण्यास प्रोत्साहित करेल. माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मला आता प्राणी खूप आवडू लागले आहेत”, असं सई म्हणाली.
पहा ट्रेलर-
View this post on Instagram
‘पेट पुराण’चे दिग्दर्शन व लेखन ज्ञानेश जोटिंग यांनी केले असून ह्यूज प्रॉडक्शन्सचे रणजित गुगले हे या सीरिजचे निर्माते आहेत. सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांच्या भूमिका असलेली सीरिज येत्या 6 मे रोजी मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड व बंगाली या भाषांमध्ये सोनी लिव्हवर सुरू होणार आहे.