‘क्राइम पेट्रोल’च्या निर्मात्यांची ‘गँग्स ऑफ वासेपूर’च्या लेखकाकडून फसवणूक, झीशान कादरीविरोधात गुन्हा दाखल
बॉलिवूड चित्रपट 'गँग्स ऑफ वासेपूर'चा (Gangs of Wasseypur) लेखक आणि अभिनेता झीशान कादरी (Zeeshan Kadri) याच्यावर निर्मात्यांकडून 38 लाख रुपयांची ऑडी कार लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘क्राइम पेट्रोल’च्या (Crime Patrol) निर्मात्यांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी मुंबईतील मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बॉलिवूड चित्रपट ‘गँग्स ऑफ वासेपूर’चा (Gangs of Wasseypur) लेखक आणि अभिनेता झीशान कादरी (Zeeshan Kadri) याच्यावर निर्मात्यांकडून 38 लाख रुपयांची ऑडी कार लुटल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘क्राइम पेट्रोल डायल 100’च्या निर्मात्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मालाड पोलिसांनी गुरुवारी कादरीविरोधात गुन्हा दाखल केला. झीशान कादरी याने केवळ निर्मात्याची कारच उधार घेतली नाही, तर वर्षभरापासून त्याचे कॉल्सही उचलले नाहीत आणि 12 लाख रुपयांना कार गहाण ठेवल्याचा आरोप आहे. मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जून 2021 रोजी झीशान कादरी ‘क्राइम पेट्रोल’च्या निर्मात्या राजबाला ढाका चौधरी यांच्या घरी आला आणि त्याने मुलगा समीर चौधरीला कॉमेडी शो बनवण्याची ऑफर दिली. हा शो सब टीव्हीवर प्रसारित होणार होता. यानंतर हळूहळू कादरी यांनी चौधरी यांना शोच्या निर्मितीसाठी भागीदारीची ऑफर दिली. चौधरी यांनीही या शोला आर्थिक मदत करण्याचं मान्य केलं होतं.
कार परत मागितली तर फोन उचलणंही केलं बंद
कादरी यांनी वाहिनीचे प्रमुख, दिग्दर्शक आणि कार्यक्रमातील कलाकारांसोबत चर्चा करण्यासाठी कारची गरज असल्याचं सांगितलं. कादरी यांनी चौधरी यांच्याकडे त्यांची ऑडी कार उधार मागितली. क्राईम पेट्रोलच्या निर्मात्यांनी ती कार कादरी यांना काही दिवसांसाठी दिली होती. महिनाभरानंतर चौधरी यांनी कादरी यांना त्यांची कार परत मागण्यास सुरुवात केली असता त्यांनी फोन उचलणं बंद केलं.
दुसऱ्यांची गाडी तिसऱ्याकडे ठेवली गहाण
झीशान कादरी यांनी फोन उचलला तरी कुठल्या ना कुठल्या बहाण्याने ते पटकन फोन ठेवायचे. कधी ते हायकोर्टात असल्याचं कारण पुढे करत तर कधी मीटिंगमध्ये असल्याचं कारण पुढे करत. असं बराच काळ सुरू असून वर्षभरानंतरही कादरी यांनी कार परत केली नाही. चौधरी यांना कारची माहिती मिळाली तेव्हा कळलं की त्यांनी ती कार त्यांच्या एका मैत्रिणीकडे 12 लाख रुपयांसाठी गहाण ठेवली. यानंतर त्यांनी कादरीविरोधात तक्रार दाखल केली.