Video: .. अन् सिनेमा पाहून मुख्यमंत्री रडू लागले; आठवले ‘ते’ खास क्षण
गेल्या वर्षी बसवराज यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये ते त्यांच्या पाळीव श्वानाला अखेरचा निरोप देताना पहायला मिळत होते.
रक्षित शेट्टीची (Rakshit Shetty) मुख्य भूमिका असलेला ‘777 चार्ली’ हा चित्रपट पाहिल्यानंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री (Karnataka CM) बसवराज बोम्मई (Karnataka CM) यांना अश्रू अनावर झाले. या चित्रपटात नकारात्मक आणि एकलकोंडी आयुष्य जगणाऱ्या नायकाच्या आयुष्यात एक कुत्रा येतो आणि त्यानंतर त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. गेल्या वर्षी मुख्यमंत्री बोम्मई यांच्या पाळीव श्वानाने आपला जीव गमावला होता. त्यामुळे चित्रपट पाहताना त्यांचे डोळे पाणावले. 777 चार्ली या चित्रपटात रक्षितने धर्माची भूमिका साकारली आहे. ज्याला एक लॅब्राडोर पिल्लू सापडतं आणि दोघांमध्ये अनपेक्षित बंध निर्माण होतो. रक्षितशिवाय या चित्रपटात संगीता शृंगेरी, राज बी शेट्टी आणि बॉबी सिम्हा यांच्याही भूमिका आहेत.
“रक्षित शेट्टी आणि त्याने केलेलं अभिनय अत्यंत उत्तम होतं. तशी भूमिका साकारणं सोपं नव्हतं. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या चार्ली या कुत्र्यासोबत मिळून त्याने दमदार काम केलं. या चित्रपटातून 100 टक्के त्या भावना व्यक्त होतात, ज्या एका श्वानाच्या भावना असतात. ते त्यांच्या डोळ्यांतूनच व्यक्त होतात. प्रत्येकाने हा चित्रपट पहायला हवा. मी नेहमीच अशा प्रेमाला पवित्र प्रेम म्हणतो. रक्षित शेट्टी आणि चार्लीच्या माध्यमातून या चित्रपटाने खरं प्रेम दाखवलं आहे”, असं ते म्हणाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये बोम्मई यांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळतंय.
पहा व्हिडीओ-
We run out of words to express our gratitude. We are beyond grateful to see Shri. @BSBommai , honourable Chief Minister of Karnataka accept our film with so much love ✨♥️ pic.twitter.com/cTqL8zWBbb
— 777 Charlie (@777CharlieMovie) June 14, 2022
“कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे शब्द नाहीत. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या चित्रपटाचा इतक्या प्रेमाने स्वीकार केल्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत”, अशी प्रतिक्रिया 777 चार्ली या चित्रपटाने ट्विटरच्या माध्यमातून दिली. गेल्या वर्षी बसवराज यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये ते त्यांच्या पाळीव श्वानाला अखेरचा निरोप देताना पहायला मिळत होते.