Salman Rushdie: सलमान रश्दींवरील हल्ल्याचा बॉलिवूड सेलिब्रिटींकडून निषेध; कंगना म्हणाली ‘जिहादींचं आणखी एक भयानक कृत्य’
पश्चिम न्यू यॉर्कमधील (New York) एका संस्थेने आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला रश्दी मंचावर उपस्थित होते. ते व्याख्यान सुरू करणार तोच हल्लेखोराने मंचावर धाव घेऊन त्यांच्यावर आणि संवादकावर हल्ला केला.
भारतीय वंशाचे बुकर पुरस्कार विजेते लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर शुक्रवारी व्याख्यानाच्या कार्यक्रमात एका माथेफिरुने चाकूहल्ला केला. त्यात त्यांच्या मानेला गंभीर जखम झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पश्चिम न्यू यॉर्कमधील (New York) एका संस्थेने आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला रश्दी मंचावर उपस्थित होते. ते व्याख्यान सुरू करणार तोच हल्लेखोराने मंचावर धाव घेऊन त्यांच्यावर आणि संवादकावर हल्ला केला. लेखकावर झालेल्या या अमानुष हल्ल्यावर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या (Bollywood Celebs) प्रतिक्रियाही समोर येत आहेत.
अभिनेत्री कंगना रनौतने रश्दींवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. “आणखी एक दिवस, जिहादींचं आणखी एक भयानक कृत्य. ‘द सॅटनिक व्हर्सेस’ हे त्यांच्या काळातील सर्वात महान पुस्तकांपैकी एक होतं. माझ्याकडे शब्द नाहीत, मी हादरलेय.. भयंकर!”, असं तिने म्हटलंय. कंगनाने एका बातमीचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे, ज्यामध्ये रश्दी यांना हल्ल्यानंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचं म्हटलं गेलंय.
कंगनाशिवाय गीतकार जावेद अख्तर यांनीसुद्धा सलमान रश्दी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांनी ट्विट केलं की, “काही कट्टरपंथियांनी सलमान रश्दी यांच्यावर केलेल्या अमानुष हल्ल्याचा मी निषेध करतो. मला आशा आहे की न्यूयॉर्क पोलीस आणि न्यायालय हल्लेखोराविरुद्ध कठोर कारवाई करतील.”
लेखिका तस्लिमा नसरीन यांनी लिहिलं, “मला नुकतंच कळलंय की न्यू यॉर्कमध्ये सलमान रश्दी यांच्यावर हल्ला झाला. मला खरोखरच धक्का बसला आहे. असं घडेल हे मला कधीच वाटलं नव्हतं. ते पश्चिमेत राहत आहेत आणि 1989 पासून त्यांना संरक्षण आहे. जर त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो, तर जे कोणी कट्टर इस्लामवादी आहेत त्यांच्यावरही हल्ला होऊ शकतो. मी चिंतेत आहे.”
सलमान रश्दींच्या हल्लेखोराला सुरक्षारक्षकांनी अटक केली असून पोलिसांनी या हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. मूळ मुंबईत जन्मलेल्या रश्दी यांची ‘द सॅटनिक व्हर्सेस’ ही कादंबरी वादग्रस्त ठरली होती. त्यांना ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यांच्या ‘मिडनाईट चिल्ड्रेन’ या कादंबरीला प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार मिळाला आहे.