Jai Bhim: सूर्याचा ‘जय भीम’ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; निर्माते-दिग्दर्शकांविरुद्ध FIR दाखल
जानेवारी 2019 मध्ये दिग्दर्शक टी. जे. ग्यानवेल यांनी आपल्या निवासस्थानी भेट घेतली आणि 1993 मध्ये घडलेल्या घटनेचा तपशील विचारल्याचाही दावाही तक्रारकर्त्यांनी केला आहे.
अभिनेता सूर्याचा (Suriya) ‘जय भीम’ (Jai Bhim) हा चित्रपट पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. चेन्नई पोलिसांनी (Chennai Police) कॉपीराईट कायद्याअंतर्गत या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. निर्मात्यांनी चित्रपटात आपल्या आयुष्याचा संघर्ष मांडला असून रॉयल्टीचे पैसे दिले नसल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. व्ही. कुलंजियप्पन यांनी ही तक्रार दाखल केली. चित्रपटातील व्यक्तीरेखा ही त्यांच्यावर आधारित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दंडाधिकारी न्यायालयाकडून निर्देश मिळाल्यानंतर चेन्नई पोलिसांनी एफआयआर दाखल केली. दिग्दर्शक टी. जे. ग्यानवेल आणि 2 डी प्रॉडक्शन हाऊसविरोधात कॉपीराईट कायद्यातील सेक्शन 63 (अ) अंतर्गत ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
जानेवारी 2019 मध्ये दिग्दर्शक टी. जे. ग्यानवेल यांनी आपल्या निवासस्थानी भेट घेतली आणि 1993 मध्ये घडलेल्या घटनेचा तपशील विचारल्याचाही दावाही तक्रारकर्त्यांनी केला आहे. त्यावेळी दिग्दर्शकांनी 50 लाख रुपये रॉयल्टी आणि नफ्यातील काही भाग देण्याचं आश्वासन दिल्याचंही कुलंजियप्पन यांनी सांगितलं. मात्र त्यांनी दिलेलं कोणतंही आश्वासन न पाळल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली. कुलंजियप्पन यांनी असाही आरोप केला आहे की चित्रपटात त्यांच्या समुदायाचं चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आलं आहे आणि निर्मात्यांनी आर्थिकदृष्ट्या पीडितांवर बहिष्कार टाकला असून त्यांचं शोषण केलं आहे.
जय भीम हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. वन्नियार संगम समुदायाने दिग्दर्शक टी. जे. ग्यानवेल आणि अभिनेता सुर्या यांना चित्रपटात त्यांच्या समुदायाची बदनामी केल्याबद्दल कायदेशीर नोटीस बजावली होती. दिग्दर्शकांनी ट्विट करत याप्रकरणी माफी मागितली होती.