Kitchen Kallakar: ‘किचन कल्लाकार’च्या किचनमध्ये रंगणार क्रिकेटर्सचा मसालेदार सामना
विनोद कांबळी आणि सलील अंकोला यांना ग्लोव्ह्ज घालून शेंगदाणे सोलण्याचं आव्हान देण्यात आलं. तसंच विनोद कांबळी यांनी डायलॉग बोलून आपल्या अभिनयाची झलक दाखवली. (Kitchen Kallakar)
झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘किचनकल्लाकार’(Kitchen Kallakar) या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. या कार्यक्रमात प्रेक्षकांना कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहायला मिळते. या आठवड्यात कलाकार नाही तर प्रेक्षकांचे लाडके क्रिकेटर्स या किचनमध्ये पाककलेच्या सामन्यात सहभागी होणार आहेत. सुप्रसिद्ध क्रिकेटर (Cricketers) विनोद कांबळी, सलील अंकोला आणि अमोल मुजुमदार या आठवड्यात प्रेक्षकांना महाराजांसाठी पदार्थ बनवताना दिसतील. इतकंच नव्हे तर किचनमध्ये या क्रिकेटर्ससोबत खूप धमाल, मजा, मस्ती झालेली प्रेक्षकांना पाहायला मिळेल. क्रिकेटर्ससोबत खेळण्यात आलेले गेम्सदेखील खूप मजेदार आहेत.
विनोद कांबळी आणि सलील अंकोला यांना ग्लोव्ह्ज घालून शेंगदाणे सोलण्याचं आव्हान देण्यात आलं. तसंच विनोद कांबळी यांनी डायलॉग बोलून आपल्या अभिनयाची झलक दाखवली. क्रिकेट मैदानावर पराक्रम गाजवणारे हे क्रिकेटर्स किचनमध्ये काय धुमाकूळ घालणार हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल.
किचन कल्लाकार या कार्यक्रमात पडद्यावरील आणि पडद्यामागील सेलिब्रिटींचा किचनमध्ये कस लागतो. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं आपल्या दमदार निवेदनकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर प्रशांत दामले यामध्ये परीक्षकाच्या भूमिकेत आहेत. आजवर या कार्यक्रमात कला आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींनी हजेरी लावली. आता पहिल्यांदाच क्रिकेटर्स या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पोहोचले आहेत.