Aboli: ‘अबोली’ मालिकेत गौरव घाटणेकरची एण्ट्री; साकारणार वकिलाची भूमिका
अबोलीच्या बाजून केस लढणार आहे नामांकित वकील अजिंक्य राजाध्यक्ष. सुप्रसिद्ध अभिनेता गौरव घाटणेकर (Gaurav Ghatnekar) अजिंक्य राजाध्यक्ष ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘अबोली’ (Aboli) मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. सोहमच्या खुनाचा आरोप अबोलीवर आहे. अबोलीने खरंच हा खून केलाय की तिला विनाकारण यात अडकवलं जातंय याची उकल मालिकेच्या पुढील भागांमधून होईलच. पण सध्या खुनाचं हे नाट्य कोर्टापर्यंत येऊन पोहोचलं आहे. अबोलीच्या बाजून केस लढणार आहे नामांकित वकील अजिंक्य राजाध्यक्ष. सुप्रसिद्ध अभिनेता गौरव घाटणेकर (Gaurav Ghatnekar) अजिंक्य राजाध्यक्ष ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. अबोली मालिकेतील ही वकिलाची भूमिका साकारण्यासाठी गौरव अतिशय उत्सुक आहे.
या भूमिकेविषयी सांगताना गौरव म्हणाला, “मी याआधी बऱ्याचदा वकिलाची भूमिका साकारली आहे. मला वकिलाची भूमिका साकारायला अतिशय आवडतं. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वकील साकारताना अतिशय ताकदीचे संवाद सादर करता येतात. एक अभिनेता म्हणून मला हे अतिशय आव्हानात्मक वाटतं. अजिंक्य राजाध्यक्ष हा तत्वनिष्ठ वकील आहे. अबोली निर्दोष आहे ही गोष्ट जेव्हा त्याला समजते तेव्हा तिला न्याय मिळून देण्याच्या एकमेव हेतूने तो ही केस हाती घेतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अबोलीच्या विरोधात अजिंक्यची सावत्र बहिण विजया राजाध्यक्ष केस लढत आहे. त्यामुळे अबोलीला न्याय मिळवून देण्यासाठी गौरव जीवापाड मेहनत घेणार आहे.”
View this post on Instagram
अबोली मालिकेतील न्यायाची ही सर्वात मोठी लढाई प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला मिळेल. या मालिकेत गौरी कुलकर्णी, सचित पाटील, सुरभी हांडे, प्रतीक्षा लोणकर, शर्मिष्ठा राऊत, दिप्ती लेले यांच्या भूमिका आहेत. मार्च महिन्यात या मालिकेने 100 भागांचा टप्पा पार केला.