KBC Facts: KBC च्या प्रत्येक एपिसोडमध्ये बिग बींच्या कपड्यांवर खर्च होतात लाखो रुपये, असे तयार होतात प्रश्न!
बिग बींच्या कपड्यांवर एका एपिसोडमध्ये किती पैसे खर्च होतात? विजेत्यांना किती पैसे मिळतात? 'केबीसी'मध्ये (KBC) जाणाऱ्या प्रेक्षकांनाही पैसे मिळतात का? 'कौन बनेगा करोडपती'शी संबंधित अशाच काही मजेदार गोष्टींबद्दल जाणून घेऊयात..
बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा सर्वांत लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती 14’ (Kaun Banega Crorepati 14) लवकरच सुरू होणार आहे. बिग बींनी ‘केबीसी 14’चं शूटिंग सुरू केलं आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून हा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती आहे. बिग बी हे ‘कौन बनेगा करोडपती’शी सुरुवातीपासूनच जोडले गेले आहेत. त्यांनी आतापर्यंत या शोचे 13 सिझन होस्ट केले आहेत. तर एक सिझन शाहरुख खानने होस्ट केला होता. गेल्या 13 सिझन्सपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आणि अनेकांना करोडपती बनवणाऱ्या या शोबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अनेकांना माहीत नसतील. उदाहरणार्थ, बिग बींच्या कपड्यांवर एका एपिसोडमध्ये किती पैसे खर्च होतात? विजेत्यांना किती पैसे मिळतात? ‘केबीसी’मध्ये (KBC) जाणाऱ्या प्रेक्षकांनाही पैसे मिळतात का? ‘कौन बनेगा करोडपती’शी संबंधित अशाच काही मजेदार गोष्टींबद्दल जाणून घेऊयात..
1. KBC मधील प्रश्न कोण तयार करतात?
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये विचारले जाणारे प्रश्न कोण तयार करतात हे तुम्हाला माहीत आहे का? हे काम तज्ज्ञांच्या एका पॅनेलद्वारे केलं जातं, ज्यांना निर्मात्यांनी नियुक्त केलेलं असतं. यात ‘केबीसी’चा निर्माता सिद्धार्थ बसूचाही सहभाग आहे. सिद्धार्थ बसू हा या शोचा निर्माता तर आहेच पण उत्तम क्विझमास्टर देखील आहे. सिद्धार्थ बसू टीमसोबत वेगवेगळ्या पॅरामीटर्स लक्षात घेऊन प्रश्न तयार करतात. हे प्रश्न वेगवेगळ्या विषयांशी संबंधित असतात. यामध्ये भारतीय संस्कृती, पौराणिक कथा, खेळ यांचाही समावेश असतो. चालू घडामोडी, राजकारण, भारत आणि जगाचा इतिहास यांसह मनोरंजन क्षेत्राशी संबंधित प्रश्नदेखील समाविष्ट असतात.
2. एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन यांच्या कपड्यांवर किती रुपये खर्च होतात?
‘कौन बनेगा करोडपती’च्या प्रत्येक एपिसोडमध्ये सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्या वॉर्डरोबवर लाखो रुपये खर्च केले जातात. रिपोर्ट्सनुसार, एका एपिसोडमध्ये बिग बींच्या कपड्यांवर सुमारे 10 लाख रुपये खर्च केले जातात. प्रत्येक एपिसोडमध्ये बिग बी टाय, ब्रोच, पिन, स्कार्फसह सूट-बूटमध्ये परफेक्ट लूकमध्ये दिसतात. त्यांच्या वॉर्डरोबसाठीचं सर्व साहित्य परदेशातून आयात केलं जातं. 13व्या सिझनमध्ये स्टायलिस्ट प्रिया पाटील यांनी अमिताभ बच्चन यांचे कपडे डिझाइन केले होते. यावेळी त्यांचा स्टायलिस्ट कोण असेल, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
3. अमिताभ बच्चन यांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहित असतं का?
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्याकडे असतं, असं अनेकांना वाटतं. तुम्ही हेही पाहिलं असेल की अनेकदा स्पर्धकांना प्रश्न विचारल्यानंतर अमिताभ म्हणतात की “माझ्याकडे पाहू नका. यात मी तुमची मदत करू शकत नाही.” बिग बीसुद्धा प्रत्येक एपिसोडच्या आधी त्यांचा अभ्यास करतात आणि भरपूर रिहर्सल करतात. ते शोमध्ये येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाची माहिती गोळा करतात जेणेकरून त्यांच्याशी बोलणं त्यांना सोपं होईल.
4. ‘संगणक’मधील प्रश्नांची पातळी कशी बदलते?
‘केबीसी’मध्ये ‘कॉम्प्युटर’वर येणारे प्रश्न हे रिअल टाइम असतात. अमिताभ बच्चन यांच्या हॉट सीटपासून काही अंतरावर संगणकावर आणखी एक व्यक्ती बसलेली असते, जी स्पर्धकांच्या कामगिरीच्या आधारे प्रश्नांची अवघड किंवा सोपी पातळी ठरवत राहते आणि ती बदलते.
5. विजेत्या स्पर्धकांना सर्व पैसे मिळतात का?
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा एखाद्या स्पर्धकाला धनादेश दिला जातो, तेव्हा बिग बी लगेच ती स्पर्धकाच्या बँक खात्यात ट्रान्सफर करतात. पण तसं होत नाही. जिंकलेल्या रकमेतून सुमारे 30% कर कापला जातो आणि त्यानंतर उर्वरित पैसे स्पर्धकांना दिले जातात. जर एखाद्या स्पर्धकाने शोमध्ये 1 कोटी रुपये जिंकले असतील तर त्याला टॅक्स कापून फक्त 70 लाख रुपये मिळतात.
6. फास्टेस्ट फिंगर फर्स्टनंतर या कारणामुळे येतो ब्रेक
फास्टेस्ट फिंगर राउंडनंतर अमिताभ बच्चन हे लगेच शो ऑन करत नाहीत. त्या फेरीत जो स्पर्धक जिंकतो, त्याचा आधी मेकअप केला जातो आणि नंतर त्याला हॉट सीटवर बसवलं जातं.