Mann Udu Udu Zala: इन्स्टाग्राम अकाऊंट ‘व्हेरिफाय’ करायला गेला अन् हॅकच झाला; ‘मन उडु उडु झालं’ फेम अजिंक्य राऊतचं अकाऊंट हॅक
सोमवारी पहाटे अजिंक्य (Ajinkya Raut) त्याच्या गावावरून मुंबईला येत होता. त्यावेळी त्याला इन्स्टाग्रामवर अकाऊंट ब्लूक टीक (व्हेरिफाय) करून मिळेल असा मेसेज आला.
‘मन उडु उडु झालं’ (Mann Udu Udu Zala) या मालिकेत इंद्राची भूमिका साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊतचा (Ajinkya Raut) इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंट हॅक झाला आहे. इन्स्टा अकाऊंट ‘व्हेरिफाय’ करण्यासाठी अजिंक्यला एक मेसेज आला होता. त्या मेसेजला रिप्लाय देताना अजिंक्यने चुकून युजरनेम आणि पासवर्डसुद्धा सांगितला. त्यानंतर त्याचा अकाऊंट हॅक झाला. सोमवारी पहाटे अजिंक्य त्याच्या गावावरून मुंबईला येत होता. त्यावेळी त्याला इन्स्टाग्रामवर अकाऊंट ब्लूक टीक (व्हेरिफाय) करून मिळेल असा मेसेज आला. संबंधित मेसेज ज्या अकाऊंटवरून आला तो अकाऊंट खरा वाटल्याने अजिंक्यची फसवणूक झाली. याप्रकरणी त्याने सायबर सेलकडे एफआयआर दाखल केली आहे. सध्या अजिंक्यचा इन्स्टाग्राम अकाऊंट बंदच आहे.
‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य म्हणाला, “याआधी मी माझं इन्स्टाग्राम अकाऊंट व्हेरिफाय करायचा प्रयत्न केला, पण तो झाला नव्हता. ज्या अकाऊंटवरून मला मेसेज आला, तो खरा वाटला. त्यामुळे मी त्या मेसेजला रिप्लाय दिला. पण माझं चुकलंच. मला केवळ माझं अकाऊंट परत नकोय तर हे काम कोणी केलंय तेसुद्धा जाणून घ्यायचंय. अशा हॅकर्सना जर आपण पकडू शकलो नाही, तर डिजिटल विश्वाचं हे खूप मोठं अपयश असेल. मला कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहितीये, मी मूर्खपणा केला. मी इतर अकाऊंट्सचे पासवर्ड बदलले, पण तरी जे व्हायचं होतं ते झालंच. अभिनेत्यासाठी सोशल मीडिया अकाऊंट खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे लवकरात लवकर ते अकाऊंट पुन्हा सुरू झालं पाहिजे.”
अजिंक्यच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गेल्यास असा मेसेज दिसतो-
“सोशल मीडिया अकाऊंटवर बऱ्याच खासगी गोष्टीसुद्धा असतात. अनेकांशी मी चॅट केलेलं असतं. पण आता त्याविषयी मी अधिक ताण घेणार नाही. मला फक्त या घटनेबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करायची आहे. चुकूनही कोणाला तुमचा पासवर्ड देऊ नका”, असं तो पुढे म्हणाला.