Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील ‘कार्तिकी’ने सोडली मालिका, पालकांनी सांगितलं महत्त्वाचं कारण
या मालिकेत दीपा आणि कार्तिक यांच्या दोन्ही मुली म्हणजेच दीपिका आणि कार्तिकी या चांगल्याच प्रकाशझोतात आल्या आहेत. यापैकी कार्तिकीची भूमिका ही साईशा साकारतेय. मात्र तिने ही मालिका सोडली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) या मालिकेत दीपा आणि कार्तिकचं नातं निर्णायक वळणावर आहे. कार्तिकीला (Kartiki) कार्तिकच आपले बाबा आहेत हे सत्य कळलं आहे. त्यामुळे आई बाबांनी एकत्र यावं असं तिला मनोमन वाटतंय. मालिकेत या महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असतानाच आता कार्तिकीची भूमिका साकारणारी बाल कलाकार साईशा भोईर (Saisha Bhoir) यातून बाहेर पडणार असल्याचं कळतंय. या मालिकेत दीपा आणि कार्तिक यांच्या दोन्ही मुली म्हणजेच दीपिका आणि कार्तिकी या चांगल्याच प्रकाशझोतात आल्या आहेत. यापैकी कार्तिकीची भूमिका ही साईशा साकारतेय. मात्र तिने ही मालिका सोडली आहे. आता मालिकेत कार्तिकीच्या जागी नवी बाल कलाकार प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. साईशा बाल कलाकार असली तरी सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे जवळपास दीड लाख फॉलोअर्स आहेत.
साईशाच्या आईवडिलांनी मालिकेविषयीची माहिती देण्यासाठी नुकतंच इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाइव्ह केलं होतं. त्यावेळी त्यांनी कार्तिकीने मालिका का सोडली, यामागचं कारण सांगितलं. “स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा या मालिकेत साईशा आता दिसणार नाही. जरी ती मालिकेतून दिसणार नसली तरी सोशल मीडियाद्वारे ती तुमच्या भेटीला येईल. कार्तिकीच्या भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. आम्ही कल्याणला राहतो आणि मालिकेचं शूटिंग मालाडला होतं. दररोज प्रवासात दोन-अडीच तास लागतात. त्यामुळे तिला शाळा आणि अभ्यासासाठी फार वेळ देता येत नाही. तिच्या तब्येतीवरही परिणाम होऊ लागला”, असं ते म्हणाले.
पहा व्हिडीओ-
View this post on Instagram
साईशा आता मालिकेत जरी दिसणार नसली तरी ती वेगळ्या प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे समजेल. आता मालिकेत साईशाची जागा कोण घेणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या मालिकेत रेश्मा शिंदे आणि आशुतोष गोखले मुख्य भूमिका साकारत आहेत. याशिवाय हर्षदा खानविलकर, विदिशा म्हस्कर, अनघा भगारे यांच्याही भूमिका आहेत.