Satyavan Savitri: ‘सत्यवान सावित्री’ मालिकेत ‘हा’ अभिनेता साकारणार सत्यवानाची भूमिका
आपल्या प्रेमावरील अतूट विश्वासाच्या जोरावर साक्षात यमराजांकडून पतीचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची गोष्ट प्रेक्षकांना या मालिकेत पहायला मिळणार आहे.
गोष्ट अशा प्रेमाची ज्याच्यापुढे ‘मृत्यू’ ही हरला. नवी मालिका ‘सत्यवान सावित्री’ (Satyavan Savitri) लवकरच झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संयमी, सौम्य आणि शूर जंगलपुत्र अशी ‘सत्यवान’ (Satyavan) यांची भूमिका अभिनेता आदित्य दुर्वे (Aditya Durve) साकारणार आहे. ही मालिका 12 जून पासून संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आदित्यची ही पहिलीच पौराणिक मालिका असून यातील भूमिकाही आदित्यसाठी आव्हानात्मक आहे. आपल्या प्रेमावरील अतूट विश्वासाच्या जोरावर साक्षात यमराजांकडून पतीचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रीची गोष्ट प्रेक्षकांना या मालिकेत पहायला मिळणार आहे.
या भूमिकेबद्दल बोलताना आदित्य म्हणाला, “पौराणिक मालिकेत काम करणं हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. मी याबद्दल कधी विचार नव्हता केला. पण ऑडिशननंतर जेव्हा मालिकेत माझी निवड झाल्याचं मला कळलं तेव्हा मी आनंदी होतो आणि त्याच सोबत नर्व्हसदेखील होतो. सगळ्या टीमने माझी खूप मदत केली आहे. या मालिकेत एक वेगळीच बोलीभाषा ऐकायला मिळेल. जेव्हा मी ती पहिल्यांदा ऐकली तेव्हा मला देखील ती खूप गोड वाटली. पण बोलताना ती खूपच आव्हानात्मक आहे. ती भाषा बोलण्यासाठी सोपी होण्यासाठी मला 10 ते 15 दिवसांचा सराव करावा लागला. सत्यवान हा एक लाकूडतोड्या होता त्यामुळे त्याची शरीरयष्टी कशी असेल याचा विचार करून मी माझ्या देहबोली आणि शरीरयष्टीवर देखील लक्ष दिला. जेव्हा प्रेक्षक या मालिकेचा पहिला भाग पाहतील तेव्हा त्यांच्या मनात असलेली सत्यवानाची प्रतिमा मी छोट्या पडद्यावर साकारली असेन अशी मला आशा आहे.”
View this post on Instagram
या भूमिकेमुळे आदित्यमध्ये झालेले बदल याबद्दल सांगताना आदित्य म्हणाला, “कुठली भूमिका साकारताना त्या भूमिकेतील काही गुण हे आपल्यात येतात. सत्यवानाने कुठलीही गोष्ट एकदा ठरवली तर ती पूर्णत्वाला नेतो. सत्यवान हा सगळ्यांची काळजी घेणारा आहे. तसेच सत्यवानामधला सगळ्यात मोठा गुण म्हणजे ऐकीव गोष्टींवर नाही तर जे दिसतं त्याची खात्री करून सत्यवान गोष्टींवर विश्वास ठेवतो. हे सगळे गुण माझ्यामध्ये देखील हळूहळू आत्मसात होत आहेत.”