RRR: राजामौलींच्या RRR चित्रपटाविषयी महत्त्वाची बातमी; अमेरिकी मीडियाची मोठी भविष्यवाणी
550 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या एस. एस. राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ज्युनियर एनटीआर आणि रामचरणची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
एस. एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित RRR या चित्रपटाला ऑस्कर (Oscar) पुरस्कार मिळेल का? ज्युनियन एनटीआर आणि रामचरणच्या जोडीला नॉमिनेशन मिळणार का? सध्या अनेकजण या प्रश्नांची उत्तरं शोधत आहेत. पण अचानक सोशल मीडियावर ऑस्कर आणि आरआरआर या चित्रपटाबद्दल इतके प्रश्न का विचारू लागले आहेत, हे तुम्हाला माहितीये का? यामागचं कारण म्हणजे अमेरिकेतील मीडिया कंपनी ‘व्हरायटी’ने ऑस्करसाठी विविध श्रेणींमध्ये नामांकन मिळणाऱ्या चित्रपटांची संभाव्य यादी जाहीर केली आहे. या यादीत समाविष्ट केलेल्या दोन श्रेणींमध्ये RRR चं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे.
व्हरायटीने दिलेल्या वृत्तानुसार, बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘RRR’ या चित्रपटाला ‘दोस्ती’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळू शकतं. एम. एम. कीरवानी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणे चित्रपटात रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या मैत्रीवर चित्रीत करण्यात आलं आहे. सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीमध्ये एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स मधील “दिस इज अ लाइफ”, मॅव्हरिकचं “होली म्यू हँड” आणि टर्निंग रेडचं “नोबडी लाइक यू” यांसारख्या गाण्यांचाही समावेश आहे.
इतकंच नाही तर व्हरायटीनुसार सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीमध्ये RRR चं नाव देखील समाविष्ट होऊ शकतं. या श्रेणीत ऑस्कर जिंकण्याच्या शर्यतीत दिग्दर्शक सँटियागो मित्रेचा अर्जेंटिना 1985, एलेजांद्रो गोन्झालेझ इरिटूचा बार्डो, लुकास डोंट्स क्लोज आणि अली अब्बासीचा होली स्पायडर यांचीही नावं आहेत.
550 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या एस. एस. राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ज्युनियर एनटीआर आणि रामचरणची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 903.68 कोटींचा गल्ला जमवला होता. एवढंच नाही तर राजामौली यांच्या या चित्रपटाला विदेशातही चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने परदेशात 208.02 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. म्हणजेच जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने एकूण 1111.7 कोटींची कमाई केली. 1000 कोटींचा टप्पा पार करणारा एस. एस. राजामौली यांचा हा दुसरा चित्रपट आहे.