Nupur Shikhare: कोण आहे आमिर खानचा होणारा जावई? सुष्मिता सेनशीही आहे जवळचं नातं
आमिरची मुलगी आयरा खानने 'या' मराठमोळ्या तरुणाशी केला साखरपुडा
अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खानने (Ira Khan) बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) नुकताच साखरपुडा केला आहे. नुपूरने फिल्मी स्टाईलमध्ये आयराला प्रपोज केलं आणि साखरपुड्याची अंगठी घातली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. आयरा आणि नुपूर हे 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. आयरा तिच्या आणि नुपूरच्या नात्याविषयी सोशल मीडियावर नेहमीच मोकळेपणे व्यक्त झाली. आता आमिर खानचा होणारा हा जावई नेमका कोण आहे आणि तो काय करतो, याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे.
कोण आहे नुपूर शिखरे?
नुपूर हा बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना फिटनेसचं प्रशिक्षण देतो. त्याचप्रमाणे तो उत्तम डान्सरसुद्धा आहे. इतकंच नव्हे तर तो राज्यस्तरीय टेनिसपटूही होता.
नुपूरचा जन्म 17 ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मुंबईत आर. ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली. नुपूरची आई प्रीतम शिखरे या नृत्य शिक्षिका आहेत.
View this post on Instagram
सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर
35 वर्षीय नुपूर हा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. आयरा खानला तो गेल्या काही काळापासून फिटनेसचं प्रशिक्षण देत आहे. हे दोघं 2020 पासून एकमेकांना डेट करू लागले. सोशल मीडियावर ते एकमेकांचे अनेकदा फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. या दोघांनी कधीच आपलं नातं लपवलं नाही.
View this post on Instagram
सुष्मिता सेनला दिलं प्रशिक्षण
नुपूरने अभिनेत्री सुष्मिता सेनलाही फिटनेसचं प्रशिक्षणही दिलं आहे. सुष्मिता तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती खूप वर्कआऊट करते आणि तिचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. सुष्मिताने नुपूरकडून दोन वर्षे प्रशिक्षण घेतल्याचं सांगितलं जातं. केवळ सुष्मिता सेनच नाही तर नुपूर हा आमिर खानचाही फिटनेस ट्रेनर होता. नुपूरला खूप आधीपासून ओळखत असल्याने आमिरनेही त्यांच्या नात्याला होकार दिला आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावर सक्रिय असलेला नुपूर अनेकदा त्याच्या डान्सचेही व्हिडीओ शेअर करतो. टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशनच्या ‘वॉर’ चित्रपटातील ‘जय जय शिव शंकर’ या गाण्यावर त्याने अप्रतिम डान्स केला होता. इतकंच नव्हे तर तो राज्यस्तरीय टेनिसपटूसुद्धा आहे. त्याने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. 2014 मध्ये त्याने आयर्नमॅन 70.3 वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि अल्टिमेट बीस्टमास्टर सीझन 2 या स्पर्धांमध्येही भाग घेतला होता.