VIDEO: शाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर कोकेन नाही, पिठी साखर सापडली म्हणून सांगतील; भुजबळांची जोरदार टोलेबाजी
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जसह पकडण्यात आलं आहे. त्यावरून भाजप सातत्याने प्रतिक्रिया देत आहे. उद्या जर शाहरुख खानने भाजपमध्ये प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील. (Drugs Will Become Sugar Powder If Shah Rukh Khan Joins BJP: Chhagan Bhujbal )
बीड: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जसह पकडण्यात आलं आहे. त्यावरून भाजप सातत्याने प्रतिक्रिया देत आहे. उद्या जर शाहरुख खानने भाजपमध्ये प्रवेश केला तर कोकेन नाही, पिठी साखर सापडली म्हणून सांगतील, अशी जोरदार टोलेबाजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.
छगन भुजबळ पहिल्यांदाच बीडमध्ये आले होते. सध्या कोणावरही धाडी सुरू आहेत. शाहरुख खान उद्या भाजपमध्ये गेल्यानंतर इथे कोकेन नाही तर पिठी साखर सापडली असे म्हणतील, अशी टीका भुजबळांनी भाजपवर केली. तसेच सध्या संपूर्ण बॉलिवूड आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे, असंही ते म्हणाले.
धाडी पडताच पत्नी आणि मुले मॉलमध्ये थांबायचे
यावेळी त्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात राहावं लागलेल्या दिवसांच्या आठवणींना उजळा दिला. मी बांधलेल्या महाराष्ट्र सदनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मिटिंग घेत होते. या घोटाळ्याप्रकरणी माझ्यावर आरोप झाले. 100 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप झाले. 100 कोटीचा ठेका घेऊन 850 कोटींची लाच कोणी देईल का? 5 फुटाच्या म्हशीला 15 फुटाचा रेडकू कसे होईल? असा सवाल करतानाच मी आणि समीर अडीच वर्षे आत होतो. आमच्या घरावर 17 वेळी धाडी पडल्या. धाडी पडल्या की आमच्या पत्नी, मुले घाबरून मॉलमध्ये जाऊन बसायचे. तो काळ विचित्र होता. दिवसभर मॉलमध्ये राहायचं आणि रात्री घरी जायचे, असं त्यांनी सांगितलं. अजित पवारांच्या बहिणीच्या घरीही धाडी घातल्या. आठ आठ दिवस अधिकारी घरात शिरून बसले होते, असंही त्यांनी सांगितलं.
दिल्ली सरकार समोर जागरण घाला
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रत्येक पातळ्यांवर लढत आहोत. विरोधक मात्र विरोधाला विरोध करायचा म्हणून आंदोलने उभी करत आहेत. मात्र त्यांच्या आंदोलनाचे देखील आम्ही स्वागत करतो. मात्र ओबीसी आरक्षणासाठी इथे जन जागरण करण्यापेक्षा ओबीसी समाजाला घटनात्मक आरक्षण मिळावे यासाठी दिल्ली सरकार समोर जागरण घाला, असं आवाहन भुजबळ यांनी केलं.
निवडणुका येताच भाजपचं ओबीसी प्रेम जागे होते
निवडणुका जवळ आल्या की भाजपचे ओबीसी प्रेम जागे होते. मात्र ओबीसी आरक्षणाच्या विरोधात भाजपाचेच लोक कोर्टात जातात. भाजपाचे राहुल रमेश वाघ ,भाजपा धुळे जिल्हा सरचिटणीस हे अध्यादेशाच्या विरुद्ध कोर्टात गेले आहेत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी जनतेला दिली. बीड जिल्ह्यात विशेषतः परळी मध्ये जेव्हा आलो तेव्हा माझे जंगी स्वागत करण्यात आले. या जनतेचे प्रेम पाहून मी भारावून गेलो. या प्रेमाचा उतराई कसा होऊ हे कळत नाही, अश्या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 24 October 2021 https://t.co/bn92eASONO #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 24, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO | सोलापूर-पुणे हायवर टेम्पोचा अपघात, कोंबड्या पळवण्यासाठी स्थानिकांची झुंबड
तुळजाभवानीची पूजा, अभिषेक करण्याचे आमिष दाखवत भाविकांची ऑनलाईन लूट, 4 वेबसाईट चालकांवर गुन्हा
(Drugs Will Become Sugar Powder If Shah Rukh Khan Joins BJP: Chhagan Bhujbal )