सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यावर मध्यरात्री हल्ला, काय घडलं नेमकं?; मुख्यमंत्र्यांवर नाराजी का?
शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामागे नेमकं कोण आहे? असा सवाल केला जात आहे.
बीड | 18 सप्टेंबर 2023 : ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यावर काल मध्यरात्री हल्ला झाला आहे. अज्ञात इसमांनी वाघमारे यांना एकटं गाठून त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातून सुदैवाने वाघमारे बचावले आहेत. मात्र, हल्ल्यानंतर वाघमारे चांगलेच भयभीत झाले आहेत. वाघमारे यांनी आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचं सांगत आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी वाघमारे यांनी केली आहे. या हल्ल्यानंतर बीडमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यावर मध्यरात्री हल्ला करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील केज-आडस भागात काही अज्ञात व्यक्तींनी वाघमारे यांच्यावर हल्ला केला. नगर जिल्ह्यातील समाजाची बैठक संपवून घरी जात असताना काही हल्लेखोरांनी वाघामारे यांची गाडी रस्त्यात अडवली. त्यानंतर काही बोलण्याच्या आधीच या अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक सुरू केली. वाघमारे यांच्यावर दगडाचा प्रचंड मारा करण्यात आला. त्यामुळे वाघमारेही भांबावून गेले होते. काय करावं हेच त्यांना काही क्षण सूचलं नाही.
वारंवार मागणी करूनही…
या दगडफेकीत वाघमारे यांना जबर मार लागला आहे. त्यांच्या मुलाला आणि पुतण्यालाही जबर मार लागला आहे. वाघमारे यांच्या गाडीवर दगडाने हल्ला करत गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या. या हल्ल्यानंतर वाघमारे चांगलेच हादरून गेले आहेत. वाघमारे भयभीत झाले असून त्यांनी आपल्या मनातील खदखदही बोलून दाखवली आहे. मला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी मी वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. पण वारंवार मागणी करूनही मला सुरक्षा देण्यात आली नाही, अशी खंत व्यक्त करतानाच आज मला सुरक्षा असती तर हा हल्लाच झाला नसता असंही त्यांनी म्हटलं आहे.
मला सुरक्षा द्या
माझ्यावरील हल्ल्याने आमचं कुटुंब हादरून गेलं आहे. आमच्या जीवाला धोका आहे. हल्लेखोर कोण माहीत नाही. या हल्ल्याची चौकशी व्हावीच. पण कृपया मला आणि माझ्या कुटूंबाच्या जीवितला धोका असल्याने मला सुरक्षा पुरवावी, अशी मागणीच वाघमारे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे वाघमारे यांना सुरक्षा पुरवली जाते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.