Shivsena NCP: राऊत म्हणतात, गृहखात्याने अधिक सक्षम व्हावं, मुख्यमंत्री म्हणाले, दिलीप वळसे-पाटील उत्तम काम करताहेत
शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी गृहखात्याने अधिक सक्षम होण्याची गरज व्यक्त करून गृहखात्यावर बोट ठेवलं आहे. त्यामुळे गृहखात्याच्या कामकाजावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी गृहखात्याने अधिक सक्षम होण्याची गरज व्यक्त करून गृहखात्यावर बोट ठेवलं आहे. त्यामुळे गृहखात्याच्या कामकाजावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही पक्षातील या बेबनावाच्या चर्चा सुरू असतानाच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत तासभर चर्चा झाली. भाजप नेत्यांवर पुरावे देऊनही गृहखात्याकडून कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांवर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, राऊत यांनी गृहमंत्रालयाला सक्षम बनण्याचा सल्ला दिला असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी मात्र, या भेटीनंतर दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) उत्तम काम करत असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलीप वळसे पाटील यांची पाठराखण केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. येणाऱ्या काळात भाजप नेत्यांवर कारवाई करण्याबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले का अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर गृहखात्यावरून सुरू असलेल्या धुसफूशीवर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे, आणि ते उत्तम काम करीत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
राऊत काय म्हणाले होते?
गृहखात्याने अधिक सक्षम झालं पाहिजे. काल या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. तपास यंत्रणा राज्यात येऊन कारवाया करत आहेत हे गृहखात्यावर आक्रमण आहे. या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे. आस्ते कदम भूमिका कोणी घेत असेल तर ते स्वत:साठी फाशीचा दोर वळत आहेत. आता गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल. नाही तर तुम्ही तुमच्यासाठी रोज नवा खड्डा खोदाल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला होता.
संबंधित बातम्या: