गरज भासल्यास परळीतून धनंजय मुंडेंविरुद्ध निवडणूक लढणार, करुणा शर्मा यांचा पवित्रा, शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा!
मागील वर्षी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांनी आता स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील भ्रष्टाचाराविरोधात सत्तेत येऊन लढणार असल्याचं त्यांनी अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत सांगितलं.
अहमदनगरः सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी शिवशक्ती पक्षाची घोषणा केली. वेळ पडली तर पती धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवेन, असा इशाराही त्यांनी दिला. मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. त्यांचं मूळ नाव करुणा शर्मा असून त्या मूळ मध्यप्रदेशातील इंदूरच्या आहेत. या आरोपानंतर महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी समाजमाध्यमांवर करुणा शर्मा आणि आपले संबंध असून ही बाब कुटुंबियांनाही अवगत असल्याची कबूली दिली होती.
काय म्हणाल्या करुणा मुंडे?
अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, महाराष्ट्रात हजारो कोटींचे घोटाळे होत असून या घोटाळ्यांमुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत. पक्षात येण्यापासून निवडणूक लढवणे आणि मंत्री होईपर्यंत कोट्यवधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाहीत. एक मंत्री दीड ते दोन हजार कोटींचे घोटाळे करतो. हा सर्व भ्रष्टाचार संपावायचा असून त्यासाठी माझा पक्ष काम करेल. वेळप्रसंगी परळी येथून निवडणूक लढवणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
पक्षाचे नाव शिवशक्ती सेना!
करुणा शर्मा या मुंबईतील जीवनज्योती या संस्थेच्या माध्यामातून काम करत असल्याची माहिती त्यांनी यापूर्वी दिली होती. आता राज्यातील भ्रष्टाचाराविरोधात काम करण्यासाठी शिवशक्ती सेना या पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मागील 25 वर्षांपासून आपण अनेक यातना सहन केल्या आहेत. त्यामुळे आता घराबाहेर पडून पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या पक्षात सर्वसामान्य जनतेला स्थान असेल. विशेष म्हणजे काही मंत्र्यांच्या बायकांनीही माझ्याशी संपर्क केला असून त्यांनी माझ्या पक्ष स्थापनेला पाठिंबा दिलाय, असा दावा करुणा शर्मा यांनी केला.
पक्षाची स्थापना कधी करणार?
पत्रकार परिषदेत बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, 30 जानेवारी 2022 रोजी अहमदनगर येथे त्या मोठा मेळावा घेणार आहेत. यावेळी लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानीचे दर्शन घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवा पक्ष सामान्यांचा, पतीलाही स्थान नाही
करुणा शर्मा म्हणाल्या, माझ्या पक्षात फक्त समाजकार्य करणाऱ्यांना स्थान असेल. समाजकारण करताना सत्तेत असणं मला गरजेचं वाटतं. तसेच राजकारण आपण जवळून पाहिलं आहे. पोलिसांचा वापर यासाठी कसा होतो, हेही पाहिलं आहे. सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. त्यात पोलिसांचा बळी जातोय. परमवीरसिंग, वानखेडे ही त्याचीच उदाहरणे आहेत. तर दुसरीकडे अजित पवार, धनंजय मुंडे यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचं बोललं जातं. त्यांच्याविषयी कुणीच काही बोलत नाही. त्याामुळे पक्ष म्हणून याविरोधात काम करणार, असा इशारा करुणा शर्मा यांनी दिलाय. तसेच मी एक नवी सुरुवात करत असून हा पक्ष सामान्याचा आहे, यात माझ्या पतीलासुद्धा स्थान देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
इतर बातम्या-