Mumbai Maharashtra News Live | श्रद्धेय महोदयांना काड्या करायचं माहिती, जरांगे पाटलांचा रोख कुणाकडे?
Maharashtra Marathi News LIVE Updates : आज गुरुवार दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजीच्या राज्य आणि देशातील सुपरफास्ट बातम्या जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
मुंबई | 26 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून उपोषण सुरू केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. शिर्डीतील काकडी विमानतळाजवळील मैदानावर मोदी शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे आज एक दिवस अन्नत्याग करणार आहेत. यासह राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
Manoj Jarange सापाला दूध पाजण्याचं काम श्रद्धेय महोदयांनी केलं : मनोज जरांगे पाटील
मुंबई | श्रद्धेय महोदयांनी सापाला दूध पाजण्याचं काम केलंय, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तसेच श्रद्धेय महोदयांना काड्या करायचं माहिती आहे. श्रद्धेय महोदयांनी विचारात बदल करायला हवा, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटल्याने त्यांचा नक्की रोख कुणाकडे आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
-
अनेक गांवात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी, मराठा तरुण आक्रमक
इंदापूर | मराठा आरक्षणासाठी पुण्याच्या इंदापूर मध्ये तहसील कार्यालयासमोर शेकडो मराठा समाज बांधव साखळी उपोषणाला बसले आहेत. समाज बांधवानी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केलीय. इंदापूर तालुक्यातील अनेक गांवात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी देखील करण्यात आली आहे. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार. सोबतच 28 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाचा इशाराही या तरुणांनी दिला आहे.
-
-
जळगावमध्ये लाकडं जाळून राष्ट्रीय महामार्ग रोखला
जळगाव : जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जात प्रमाणपत्र सुरळीत मिळावे यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी बांधवांचे १६ दिवसांपासून आमरण अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरु आहे. यातील एका कोळी बांधवाची प्रकृती गंभीर झाल्याने कोळी बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. शासनाकडून मागण्यांबाबत कुठलीही दखल घेतली जात नसल्याने कोळी समाज बांधव आक्रमक झाले आहेत.
-
हल्ला केला ते मामुली आणि चिल्लर : गुणरत्न सदावर्ते
मुंबई : ज्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला ते हल्ला केला मामुली आणि चिल्लर आहेत. त्यांच्यावर मी बोलणार नाही. त्यांच्या मागे असणाऱ्या मास्टर माईंडवर बोलेल. सुप्रिया सुळे म्हणालेल्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम होणार. तो हाच कार्यक्रम आहे का? असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि ज्यांनी हल्ला केला त्यांचे लोकेशन तपासा अशी मागणीही त्यांनी केली.
-
अज्ञात चोरट्याने पळवले पन्नास तोळे सोने
सातारा : फलटण तालुक्यातील जिंती येथे धाडसी चोरी करून तब्बल पन्नास तोळे सोने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. आदित्य अशोक रणरवरे हे तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घरामध्ये प्रवेश केला. कपाट आणि बेडमधील तब्बल पन्नास तोळे चोरून नेले. फलटण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
-
नवी मुंबईतही मराठा समाजातर्फे साखळी उपोषणाला सुरुवात
नवी मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आजपासून नवी मुंबईत देखील मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आलंय. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळावे आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी हे साखळी उपोषण सुरु आहे.
-
मुंबईतील दहिसर पूर्व एसव्ही रोडवरील सुधीर फडके पुलाखालून जाणाऱ्या रिक्षाला अचानक आग
मुंबई : मुंबईतील दहिसर पूर्व एसव्ही रोडवरील सुधीर फडके पुलाखालून जाणाऱ्या रिक्षाला अचानक आग लागली. आगीमुळे रिक्षा काही मिनिटांतच जळून खाक झाली. आग लागल्याचे समजताच रिक्षाचालक रिक्षातून बाहेर आला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
-
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण लवकर द्या अन्यथा राज्यांमध्ये उद्रेक होईल, असा मराठा क्रांती सेनेचा राज्य सरकारला इशारा दिला आहे. शहरामध्ये गाव खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये खासदार आमदार नेत्यांना फिरू देणार नाही, असे मराठा क्रांती सेनेने इशारा दिलाय. तर मराठा क्रांती सेनेच्या वतीने गावोगावी जाऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
-
दौडमध्ये तलवारीचे प्रदर्शन केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
सोलापूर : सोलापुरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौडमध्ये तलवारीचे प्रदर्शन केल्याने कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय. सोलापुरात विजयादशमीला काढण्यात आलेल्या दुर्गामाता दौडमध्ये तलवार बाळगत तिचे प्रदर्शन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरषोत्तम कारकल, ओंकार देशमुख, अभिषेक इंगळे, समीर पाटील, ऋषिकेश धाराशिवकर यांच्यासह अन्य 4 ते 5 लोकांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
-
बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नवी मुंबईतील नेरुळ येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच पार्थिव नेरूळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आलंय. उद्या संध्याकाळी पाच वाजता नेरूळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
-
बोर्ड लिहून मराठा तरूणाची आत्महत्या, काय म्हटलंय बोर्डावर?
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केली आहे. वय वर्ष 28 असणाऱ्या तरूणाने बोर्ड लिहून आत्महत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील अपतगाव या गावातील हा तरुण आहे. गणेश कुबेर असं आत्महत्या केलेल्या 28 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तर जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मला जाळू नका, असा बोर्डवर उल्लेख केला आहे.
-
शर्मिला ठाकरे काढणार पाण्यासाठी मोर्चा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उध्या विरारमध्ये पाण्यासाठी भव्य मोर्चा निघणार आहे. विरार पूर्व आर जे नाका ते वसई विरार महापालिका मुख्य कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरवात होणार आहे.
-
Narendra Modi | पाण्याचा प्रत्येक थेंब वापरा
पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ नये. ईश्वराने दिलेली हे देणगी आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वापरण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा.
-
Narendra Modi | आता योजनांचे आकडे, पूर्वी भ्रष्टाचाराचे होते
२०१४ पूर्वी अनेक आकडे तुम्ही ऐकले असतील. हे आकडे भ्रष्टाचाराचे होते. आता जे आकडे मी सांगतो, ते गरीबांसाठी तयार केलेल्या योजनांचे आहे. महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली. यामुळे राज्यातील लहान शेतकऱ्यांना सन्मान निधीचे १२ हजार रुपये मिळणार आहेत.
-
Narendra Modi | देशात प्रत्येक गरीबास पुढे जाण्याची संधी
देशातील प्रत्येक गरीबास पुढे जाण्याची संधी आहे. देशात गरीबांसाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. आयुष्यमान भारत योजनचे कार्ड लाखो भारतीयांना मिळाले आहे.
-
विकासकामं पाहून काहींचं पोट दुखतं – मुख्यमंत्री शिंदे
पंतप्रधानांचा हात लागताच त्या गोष्टीचं सोनं होतं, म्हणून आम्ही त्यांना वारंवार राज्यात बोलावतो. पण त्यामुळे, विकासकामं पाहून काहींच्या पोटात दुखतं, त्यांच्याकडे आम्हाला बघायचं नाहीये, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
-
पंतप्रधान मोदींची लोकशाहीवर अपार श्रद्धा – मुख्यमंत्री शिंदे
पंतप्रधान मोदींची लोकशाहीवर अपार श्रद्धा आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नमो शेतकरी महासन्मान सोहळ्यात ते उपस्थितांना संबोधित करत आहेत.
ते ज्या कामाला हाता लावतात, ज्याचं भूमीपूजन करतात तो प्रकल्प वायूवेगाने पुढे जातो, आणि पूर्ण होतो, असा अनुभव आहे. ते ज्याला हात लावतात, त्याचं सोन होतं, असंही शिंदे म्हणाले.
-
भूमीपूजन आणि उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होतंय याचा आनंद – देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान मोदींकडून २०१७ मध्ये विकासकामांचं भूमीपूजन झालं, आजही त्यांच्याच हस्ते विकासकामांचं लोकार्पण होतंय, याचा आनंद आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. नमो शेतकरी महासन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
-
मोदींमुळे लोककल्याणाचं काम करण्याची उर्जा मिळो- अजित पवार
मोदींमुळे लोककल्याणाचं काम करण्याची उर्जा मिळो. विकासासाठी आम्ही मोदींसोबत आहोत, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
-
शिवरायांना अभिवादन करत नमो शेतकरी महासन्मान सोहळ्याला सुरूवात
शिवरायांना अभिवादन करत नमो शेतकरी महासन्मान सोहळ्याला सुरूवात झाली. कार्यक्रमस्थळी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी उपस्थितांना संबोधित करतील.
-
पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणारे पोलिसांच्या ताब्यात
पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणारे पोलिसांच्या ताब्यात आहेत. ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महागाईच्या मुद्यावरून हे सर्व कार्यकर्ते मोदींना काळे झेंडे दाखवणार होते, मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी कारवाई केली.
-
खासदार राहुल शेवाळे मानहानी प्रकरण – उद्धव ठाकरे, राऊतांना दिलासा नाही
खासदार राहुल शेवाळे मानहानी प्रकरण, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना दिलासा नाही. त्यांच्या दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाने फेटाळला.
-
PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या कालव्याचं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या कालव्याच लोकार्पण पार पडलं. या संपूर्ण परिसराची पंतप्रधानांनी स्वत: पाहणी केली.
वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल रमेश बैस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.
-
Lalit Patil | ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणातील १७ व्या आरोपीला अटक
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणातील १७ व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. साकीनाका पोलिसांनी कुर्ला येथून अमीर अतिक शेख नावाच्या आरोपीला अटक केली. ललितचा साथीदार असलेला अमीर अतिक शेख त्याच्याकडून माल खरेदी करून मुंबईत पुरवायचा.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाचं जलपूजन संपन्न
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाचं जलपूजन पार पडलं. आता थोड्याच वेळात कालव्याचं लोकार्पण करण्यात येईल.
-
पंतप्रधान मोदी निळवंडे धरण परिसरात दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी निळवंडे धरण परिसरात दाखल, थोड्याच वेळात होणार जलपूजन.
-
पंतप्रधान मोदींनी मनोज जरांगे यांना भेटून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा – उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ तर घेतली पण आरक्षण मिळवण्याचे मार्ग काय आहेत ते जरांगे पाटील यांना समजवून सांगावे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येत आहेत. त्यांनीही मनोज जरांगे यांना भेटून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असेही ते म्हणाले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते साईंच्या पादुकांचे पूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच वर्षांनी साई बाबांच्या दर्शनाला आले आहेत. त्यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या हस्ते साईंची आरती करण्यात आली आहे. आता थोड्याच वेळात विविध विकासाच लोकार्पण होत आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डीत आगमन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डीत आगमन झाले आहे. नरेंद्र मोदी हे शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. तसेच शिर्डीतील विकास कामांची घोषणा करणार आहेत.
-
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलावरून एका बाजूची वाहतूक सुरू होण्याचा मुहूर्त लांबणीवर
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलावरून एका बाजूची वाहतूक सुरू होण्याचा मुहूर्त आणखी चार महिने लांबणीवर गेला आहे. येत्या दिवाळीपर्यंत हा पूल खुला होईल अशी लोकांना अपेक्षा होती. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, आता हा पूल सुरू करण्याची नवीन तारीख 15 फेब्रुवारी 2024 निश्चित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्याची पश्चिम उपनगरातील नागरिकांची आशा संपुष्टात आली आहे.
-
शिर्डी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा हेलिपॅडच्या दिशेने रवाना
शिर्डी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा हेलिपॅडच्या दिशेने रवाना झाला आहे. शिर्डी विमानतळावरून साईबाबा संस्थानकडे ताफा रवाना झाला आहे. हेलिपॅडवर थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार आहे. एकनाथ शिंदे हे मोदींसोबत साई मंदिरात साईदर्शनासाठी जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोड बंदोबस्त करण्यात आला आहे.
-
अमरावतीच्या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षा फी वाढी विरोधात आक्रमक
अमरावतीच्या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षा फी वाढी विरोधात आक्रमक झाले आहेत. महाविद्यालय प्रशासनाने फी वाढवल्याच्या विरोधात विद्यार्थी एकवटले आहेत. मोठ्या प्रमाणात वाढवलेले परीक्षा शुल्क रद्द करण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.
-
ललित पाटील ड्रग्ज प्रकरण : राज्य शासनाने ससून रुग्णालयाचा अहवाल तयार करण्याची दिलेली मुदत संपली
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी राज्य शासनाने ससून रुग्णालयाचा अहवाल तयार करण्याची दिलेली मुदत संपली आहे. ही मुदत 15 दिवसांची देण्यात आली होती. अहवाल तयार करण्याच काम पूर्ण झालं असून लवकरात लवकर अहवाल राज्य शासनाला सादर होणार आहे. चौकशी समितीने म्हैसेकर यांच्या अध्यक्षेतेखाली हा अहवाल तयार केला आहे.
-
छत्रपती संभाजीनगर : मंगेश साबळे यांच्या समर्थनासाठी गावकरी एकवटले
छत्रपती संभाजीनगर : मंगेश साबळे यांच्या समर्थनासाठी गावकरी एकवटले आहेत. गेवराई पायगा या गावातील सरपंच मंगेश साबळे यांच्या समर्थनार्थ ते आक्रमक झाले आहेत. गावातील चौकात एकत्र येऊन त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आहे. मंगेश साबळे यांना सोडून देण्यात यावं या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे.
-
LIVE UPDATE : मोघन बोरकुंड शिवारामध्ये नरभक्षक बिबट्याची दहशत…
मोघन बोरकुंड शिवारामध्ये नरभक्षक बिबट्याची दहशत… चार दिवसात तीन लहान मुलांवर हल्ला.. दोघांचा मृत्यू , एक गंभीर जखमी आहे. धुळे तालुक्यातील बोरकुंड मोहन शिवारात बिबट्याने हल्ला केला. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
-
LIVE UPDATE : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, मतदारांची नव्याने नोंदणी करण्याचा विद्यापीठाचा निर्णय
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी मतदारांची नव्याने नोंदणी करण्याचा विद्यापीठाचा निर्णय आहे. यावर ठाकरे गटाच्या युवासेना कोअर कमिटीची आज बैठक बोलावण्यात आली आहे.
-
LIVE UPDATE | ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन
ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
LIVE UPDATE | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे प्रकल्पाचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे प्रकल्पाचं उद्घाटन झालं आहे. उद्घाटनाच्या स्थळापासून तीन किलोमीटरवरच वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पास दिलेल्या अधिकाऱ्यांची देखील कसून चौकशी केली जाते आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे.
-
हिम्मत असेल तर मनोज जरांगेंना अटक करून दाखवा- मराठा क्रांती ठोक मोर्चा
हिम्मत असेल तर मनोज जरांगेंना अटक करून दाखवा. सर्व समाज मराठा क्रांती ठोक मोर्चा मनोज जरांगेंच्या पाठिशी आहे. शांततेत आंदोलन चालू असताना मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सदावर्ते आणि भुजबळांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाने सरकारकडे केली आहे.
-
जरांगेंना मोदींसमोर बसवले पाहिजे जे काय मागण्या आहेत त्या समोर बसून सांगितल्या पाहिजे-राऊत
जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. मात्र यावरती कुठलाही तोडगा सरकारने काढला नाही. हा तोडगा केंद्र सरकार काढणार. या अगोदर देखील मी म्हणलो होतो जरांगे यांना मोदींसमोर बसवले पाहिजे जे काय मागण्या आहेत त्या समोर बसून सांगितले पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
-
सदावर्तेंच्या आरोपींना भोईवाडा पोलिसांकडून अटक
गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर आज सकाळी त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. या नंतर त्यांच्या लोअर परळ इथल्या क्रिस्टल टाॅवर खाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तिन्ही रस्त्यांवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. आपल्या कुटूंबियांच्या जीवीतास धोका असल्याचा आरोप त्यांनी केला असून आरोपींना भोईवाडा पोलिसांनी अटक केलीये.
-
मराठा आंदोलकांसाठी अॅड. सतीश माने कायदेशीर लढाई लढणार
मराठा आंदोलकांसाठी अॅड. सतीश माने कायदेशीर लढाई लढणार आहेत. मराठा आरक्षणाचा विषय आता दिवसेंदिवस तापत चालला आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डीमध्ये दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डीमध्ये दौरा असून तेथील परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे.
-
दिल्लीने मुख्यमंत्री शिंदेंचं पायपुसणं केलं आहे – संजय राऊत
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यापूर्वी कधीही दिल्लीचे एवढे दौरे करत नव्हते. दिल्लीने मुख्यमंत्री शिंदेंचं पायपुसणं केलं आहे, असं टीकास्त्र राऊत यांनी सोडलं.
-
मोदींचे महाराष्ट्र दौरे भीतीतून – संजय राऊत
भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळे ते पंतप्रधान मोदींना वारंवार राज्यात बोलावत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. मोदींनी राज्यात जुगाड केलाय, त्याच भीतीने त्यांचे दौरे वाढले आहेत, असेही ते म्हणाले.
-
पंतप्रधान मोदींच्या शिर्डी दौऱ्यावरून सकल मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यावरून सकल मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक झाले आहेत. कार्यक्रमासाठी नागरिकांना आणायला पाठवलेल्या गाड्या आंदोलकांनी माघारी पाठवल्या.
-
सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेशबंदी, मराठा आरक्षणासाठी ३७ पेक्षा जास्त गावांमध्ये निर्णय
मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दर्शवत सोलापूरच्या माढ्यातील गावोगावी बोर्ड लागले आहेत. सर्व पक्षीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली असून तालुक्यातील ३७ पेक्षा जास्त गावांमध्ये निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षण देऊनच गावात या, असे बोर्ड लागले आहेत.
-
मुंबई-पुणे महामार्गावर आज तासाभराचा विशेष ब्लॉक
आज दुपारी १२ ते १ दरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर आज विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तासाभरासाठी बंद राहील.
-
प्रदीप कुरूलकर यांना जामीन देण्यास सरकारी पक्षाचा विरोध
डीआरडीओचे माजी संचालक, प्रदीप कुरूलकर यांना जामीन देण्यास सरकारी पक्षाने विरोध दर्शवला आहे. जामीन मिळाल्यास ते पुन्हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात येतील, असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वकिलांनी केला आहे.
-
ड्रग्स तस्करीच्या पैशातून ललित पाटीलकडून जमिनीचे व्यवहार
ड्रग्स तस्करीच्या पैशातून ललित पाटीलकडून नाशिकमध्ये जमिनीचे व्यवहार. मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याचा पोलिसांना संशय आहे. ललित पाटीलच्या गेल्या दहा वर्षांतील मालमत्ता खरेदीची तपासणी होणार.
-
Gunratne Sadavarte | ‘माझ्या मुलीला आणि पत्नीलाही जीवे मारण्याच्या धमक्या’
“मनोज जरांगेंना तातडीने अटक करा. माझ्या मुलीला आणि पत्नीलाही जीवे मारण्याच्या धमक्या. हल्लेखोर माझ्याही घरी येणार होते. पोलिसांसमोर माझ्या वाहनांची तोडफोड” असा आरोप गुणरत्ने सदावर्ते यांनी केला.
-
Gunratne Sadavarte | ‘जरांगेंच्या शांततामय आंदोलनाची हीच आहे का व्याख्या?’
“हीच आहे का शांततामय आंदोलनाची व्याख्या. मला कुणीही शांत करु शकत नाही. जरांगेंच्या शांततामय आंदोलनाची हीच आहे का व्याख्या?” असा सवाल गुणरत्ने सदावर्ते यांनी विचारला आहे. आज सकाळी मराठा तरुणांनी त्यांच्या वाहनांची तोडफोड केली.
-
Bus Accident | बीडला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात
मुंबईहून बीडच्या दिशेने येणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला. अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील आष्टा फाटा येथे हा अपघात झाला असून यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.
-
Narendra modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा. नरेंद्र मोदी आज साईबाबांच्या शिर्डीत. राज्यातील विविध 7500 कोटी रुपयांच्या विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण. तर राज्यातल्या 86 लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी लाभदायक असणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार
-
Maratha Reservation : पुढाऱ्यांना गावबंदी, मोहोळमध्ये मराठा समाजाचा कँडल मार्च
मराठा समाजाने सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. तसेच मोहोळ तालुक्यातील अंकोली गावात मराठा समाजाने काढला कँडल मार्च काढला आहे. जोवर आरक्षण मिळत नाही तोवर कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होणार नाही. त्याचबरोबर राजकीय नेत्यांना गावात येऊ न देण्याची यावेळी शपथ घेण्यात आली. या कँडल मार्चमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.
-
Rohit Pawar : रोहित पवार यांचा एक दिवसाचा अन्नत्याग, जरांगे पाटील यांना पाठिंबा
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आज एक दिवसाचा अन्न त्याग करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी रोहित पवार यांनी हा निर्णय घेतला आहे. रोहित यांची युवा संघर्ष यात्रा सुरू आहे. ही यात्रा आज शिरूरमध्ये येणार आहे.
-
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा साई चरणी, शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी मोदी तिसऱ्यांदा साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर मोदी हे काकडी विमानतळाजवळ आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
-
Maratha Reservation : मराठा तरुण भडकले, गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड
मराठा तरुण आता अधिक आक्रमक झाले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणाही दिल्या आहे.
-
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच, अन्नपाणी, औषधांचाही त्याग
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्याच्या अंतरवली सराटीत कालपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. त्यांनी अन्नपाणी आणि औषधांचाही त्याग केला आहे. जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ शेकडो मराठा बांधव अंतरवलीत एकवटले आहेत.
Published On - Oct 26,2023 6:58 AM