Aryna Khan: आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी क्लीनचीट; एनसीबी म्हणतेय आर्यनकडे ड्रग्जच नव्हते!
आर्यन खान ड्रग प्रकरणात एनसीबी मार्फत मुंबई सत्र न्यायालयात आज आरोप पत्र सादर करण्यात आलं. एकूण 6000 पानांचे आरोपपत्र आज (27 मे शुक्रवार) दुपारी सादर करण्यात आलं होतं.
मुंबई : ड्रग्जप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीबीकडून त्याला क्लीनचीट मिळाली आहे. आर्यन खान ड्रग प्रकरणात एनसीबी (NCB) मार्फत मुंबई सत्र न्यायालयात आज आरोपपत्र (Chargesheet) सादर करण्यात आलं. एकूण 6000 पानांचे आरोपपत्र आज (27 मे शुक्रवार) दुपारी सादर करण्यात आलं. आर्यन खानला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. एकूण 10 खंडांचं आरोपपत्र सादर करण्यात आलं आहे. जे सध्या न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये आहे. या प्रकरणाचा तपास विशेष एनसीबी एसआयटी करतेय. मार्च महिन्याच्या अखेरीस कोर्टाने एसआयटीला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदत वाढवून दिली होती. 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने क्रूजवर धाड टाकत ड्रग्जप्रकरणी कारवाई केली होती. कॉर्डेलिया क्रूज ड्रग प्रकरणी एकूण 20 लोकांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात आर्यन खान, अवीन साहू आणि 4 कार्यक्रम आयोजकांविरुद्ध पुरेशा पुराव्याअभावी कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. आर्यन जवळपास एक महिना कोठडीत होता.
आर्यन आणि मोहक वगळता सर्व आरोपींकडे अंमली पदार्थ आढळून आले, असं एनसीबीचे उपमहासंचालक (ऑपरेशन्स) संजय कुमार सिंग म्हणाले. 14 जणांविरुद्ध NDPS कायद्याच्या विविध कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. उर्वरित सहा जणांविरुद्ध पुराव्याअभावी तक्रार दाखल केली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ट्विट-
Cruise drug bust case | All the accused persons were found in possession of Narcotics except Aryan and Mohak, reads a statement of Sanjay Kumar Singh, DDG (Operations), NCB
— ANI (@ANI) May 27, 2022
Aryan Khan : आर्यन खानला क्लीनचीट! आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबी मार्फत मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर, आरोपपत्र एकूण 6 हजार पानी #BreakingNews #AryanKhan #crime pic.twitter.com/t191DexfdA
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 27, 2022
देशभरात गाजलं प्रकरण
2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूजवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला होता आणि या छाप्याचे नेतृत्व एनसीबी मुंबईचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी केलं होतं. सदर क्रूजवर ड्रग पार्टी सुरू आहे, अशी माहिती तेव्हा एनसीबी अधिकाऱ्यांना मिळाली होती. मात्र कारवाईदरम्यान एनसीबी टीमने आर्यन खान अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा या तिघांसोबत एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. नंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये एनसीबीचे जवळपास 22 अधिकारी हे प्रवासी बनून क्रूजवर गेले होते आणि त्यावेळी क्रूजवर जवळपास 1800 लोक होते. विशेष बाब ही आहे की या प्रकरणात समीर वानखेडेंवर अनेक आरोप करण्यात आल्यानंतर त्यांना या चौकशीतून बाजूला करण्यात आलं होतं.