VIDEO: राज्य सरकार आता पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल; अतुल भातखळकरांचा खोचक टोला
पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली आहे. त्यामुळे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकार आणि मुंबई महालिकेवर टीका केली आहे. पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे.
मुंबई: पहिल्याच पावसात मुंबई जलमय झाली आहे. त्यामुळे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकार आणि मुंबई महालिकेवर टीका केली आहे. पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे. आता राज्य सरकार बहुतेक पावसाची जबाबदारी मोदींवरच ढकलतील, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. (atul bhatkhalkar slams shiv sena over waterlogging in mumbai city)
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर अतुल भातखळकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी भातखळकर यांनी मुंबई तुंबल्याने सरकारवर निशाणा साधला. महापालिकेने मुंबई तुंबून दाखवली आहे. नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं आम्ही आधीपासून सांगत होतो, ते आज उघड झालं आहे, असं सांगतानाच राज्य सरकार आता बहुतेक पावसाची जबाबदारी मोदींवरच ढकलतील. मोदींनीच त्यातून मार्ग काढावा असं त्यांनी म्हणू नये एवढीच अपेक्षा आहे, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार कमी करून नालेसफाई नीट करा. जे पाणी तुंबण्याचे स्पॉट आहेत. त्या ठिकाणी तात्काळ कार्यवाही करा, असा आमचा पालिका आयुक्तांना सल्ला राहील, असंही ते म्हणाले.
लसीकरणाचं नियोजन करणार
आजची आढावा बैठक होती. या बैठकीला आमचे नेते बीएल संतोष, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पंतप्रधानांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. शेवटच्या स्तरापर्यंतच्या नागरिकाला ही लस मिळावी यासाठी आमचं नियोजन सुरू आहे. त्यासाठी कँम्प लावण्यात येणार आहेत, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मुलं अनाथ झाली. किती मुले अनाथ झालीत याचा आढावा घेण्यात आला असून त्यांना मदत देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबई जलमय
दरम्यान, आज सकाळपासून पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावत मुंबईची दाणादाण उडवून दिली. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. त्यामुळे सायन, चेंबूर, अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. रस्त्यावर वाहनांच्या प्रचंड रांगाच रांगा लागल्याने अनेकांना कारमध्येच तिष्ठत बसावे लागले होते. वरून कोसळणारा धोधो पाऊस आणि वाहतूककोंडीत तिष्ठत बसावे लागत असल्याने चाकरमानी संतापले होते. सकाळपासून पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 9 वाजून 50 मिनिटांनी अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, लोकल ठप्प झाल्याने चाकरमानी चांगलेच वैतागले आहेत.
चार दिवस पावसाचे
हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 4 दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहेत. या काळात 300 मिलिमीटरहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (atul bhatkhalkar slams shiv sena over waterlogging in mumbai city)
संबंधित बातम्या:
महापालिकेचा 104 टक्के नालेसफाईचा दावा 12 तासांत फोल, मुंबई तुंबल्याने विरोधक बरसले
मोठी बातमी: मुंबईत मुसळधार पाऊस, ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प
BMC Election 2021 | मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; आज महत्त्वाची बैठक
(atul bhatkhalkar slams shiv sena over waterlogging in mumbai city)