‘पिक्चर अभी बाकी है’? संजय राऊत यांना कोर्टाचे समन्स, हजर न राहिल्यास अटकेची टांगती तलवार
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाने समन्स बजावले आहेत.
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रक्षोभक भाषणाप्रकरणी बेळगाव कोर्टाने समन्स बजावले आहेत. संजय राऊत यांना 1 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राऊत कोर्टात हजर न राहिल्यास त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊतांनी 30 मार्च 2018 मध्ये बेळगावात भाषण केलं होतं. त्याच भाषणात त्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.
संजय राऊत यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका बेळगावातील स्थानिक पोलिसांनीच ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. आता या प्रकरणी काय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
विशेष म्हणजे बेळगाव-महाराष्ट्र सीमावादावरुन दोन्ही राज्यांमधील राजकीय वातावरण तापलंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील 40 गावांवर दावा सांगितलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांकडून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधण्यात आलाय. असं असताना राऊतांना कोर्टाचे समन्स आल्याने विविध चर्चांना उधाण आलंय.
‘माझ्यावर हल्ल्याचा कट किंवा अटकेचं कारस्थान’ संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
बेळगाव कोर्टाकडून समन्स आल्यानंतर संजय राऊतांची नेमकी काय भूमिका असेल? असा प्रश्न उपस्थित झाला होता. या दरम्यान संजय राऊत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडलीय.
“कर्नाटक सरकारने कायद्याचे बडगे दाखवून तुरुंगात डांबलं तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटतील. त्यात प्रक्षोभक काय ते कळलं नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
“२०१८च्या भाषणाची दखल घेऊन त्यांनी कोर्टात हजर राहायला सांगितलं आहे. याचा अर्थ मी कोर्टात जावं. मग कोर्टात गेल्यावर माझ्यावर हल्ला व्हावा. ही माझी माहिती आहे. किंवा मला अटक करावी आणि मला बेळगावच्या तुरुंगात टाकावं अशा प्रकारचं कारस्थान सुरू असल्याचं माझ्या कानावर आहे”, अशी धक्कादायक माहिती संजय राऊतांनी दिली.
“कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेलं वक्तव्य चार दिवसांपूर्वीच आहे. सोलापूर सांगलीचा भाग कर्नाटकात घेण्यासंदर्भात. त्यांनी विषयाला तोंड फोडलं. आमच्यासारख्या लढणाऱ्या लोकांना बेळगावात बोलावून हल्ला करण्याचं कारस्थान आहे. हे कारस्थान शिजताना दिसतं. याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यायला हवी”, असं संजय राऊत म्हणाले.
“शिवसेना आहेच. शिवसेनेने सीमा प्रश्नासाठी ६९ हुतात्मे दिलेत. मी ७०वा हुतात्मा व्हायला तयार आहे. बाळासाहेबांनी सीमा प्रश्नासाठी तीन महिन्याचा तुरुंगवास भोगला आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
“शिवसैनिकांनी तीन दिवस मुंबई पेटवली होती. मला अटकेची भीती नाही. महाराष्ट्रासाठी मला अटक करणार असतील तर मी नक्कीच जाईल. मी लपून छपून जाणार नाही. कोल्हापूरच्या रस्त्याने हजारो शिवसैनिक जाऊ आणि बेळगावच्या न्यायालयात स्वत:ला अटक करून घेऊ”, असं विधान संजय राऊत यांनी केलं.