भयंकरच ! मुंबईत चक्क वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून घोडे सुस्साट पळवले, घोडागाडी शर्यतीची पोलिसांना खबर मिळाली; मग…
मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून घोडे सुस्साट पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाहनांची वर्दळ असतानाच हायवेवरून घोड्यांची शर्यत लावण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे.
मुंबई : मुंबई सतत गजबलेली असते. दिवस असो की रात्र मुंबई सतत धावत असते. मुंबई हे स्वप्नांचं शहर असल्याने या शहरात देशभरातील लोक राहायला आलेले आहेत. त्यामुळे जिथे बघावं तिथे गर्दीच गर्दी असते. मार्केट सारख्या परिसरातून तर चालणंही मुश्किल होतं, इतकी गर्दी असते. रस्त्यावरूनही वाहने भरधाव वेगाने वाहत असतात. त्यामुळे रस्ता ओलांडतानाही जपूनच राहावे लागते. कारण मुंबईच्या रस्त्यावरून वाहने प्रचंड वेगाने धावत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. असं असताना कुणी या रस्त्यांवरून घोडागाडीची शर्यत आयोजित केली तर…
होय, हे खरं आहे. मुंबईत काही तरुणांनी चक्क घोड्यांची शर्यत लावली. सदा गजबलेल्या असलेल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून घोडागाडी पळवली. घोडागाडी प्रचंड वेगात पळवली. दोन तरुण या घोडागाडीत बसून घोडागाडी वेगाने पळवत होते. आजूबाजूला वाहने वाहत असतानाही ही घोडागाडी जोरात पळवली जात होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एक्सप्रेस हायवे गाठला आणि या प्रकरणी एकूण चार जणांना अटक केली. दिंडोशी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
चौघे ताब्यात
समुद्रकिनारी पर्यटकांसाठी घोडागाडी चालवली जाते. मात्र, दोन तरुण चक्क पश्चिम द्रुतगती महामार्गावर घोडागाडी चालवत असून अत्यंत वेगाने घोडे पळवले जात असल्याची तक्रार एका संस्थेने दिंडोशी पोलिसांकडे केली. या संस्थेने दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला. या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी घोडागाडी शर्यतीत सहभागी असलेल्या 4 जणांना अटक केली. तसेच ज्या घोडागाडी शर्यत केली जात होती तीही जप्त केली आहे. सध्या दिंडोशी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.
नेमकं काय घडलं?
वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर साधारण सकाळच्यावेळी ही घोडागाडी शर्यत झाली. दोन तरूण घोडागाडीत बसलेले होते. या घोडागाडीला दोन घोडे बांधलेले होते. हे दोन्ही तरुण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून या दोन्ही घोड्यांना सुस्साट पळवत होते. घोड्यांनी वेगाने पळावे म्हणून या घोड्यांना चाबकाचे फटकारे लगावले जात होते. दोन्ही तरुण या घोड्यांना सर्व शक्ती एकवटून जोरजोरात फटकारे लगावत होते. त्यामुळे घोडेही जीवाच्या आकांताने पळत होते.
त्यांच्या आजूबाजूने या तरुणांचे मित्र बाईकवरून येत होते. तेही हल्लागुल्ला करत घोड्यांना पळण्यासाठी प्रोत्साहित करत होते. घोडागाडीच्या दोन्ही बाजूने हे बाईकस्वार होते. इतर वाहनेही या एक्सप्रेस हायवेवरून धावत होती. नशिबाने यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही. नाही तर मोठा अनर्थ ओढवला असता. आतापर्यंत रस्त्यांवरून रॅश ड्रायव्हिंग पाहिली होती. पण आता चक्का घोड्यांची शर्यतच एक्सप्रेसवेवरून सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.