मनसेचा लोगो असलेली टोपी घालून येण्यास मॉलमध्ये मज्जाव, मुंबईतच घडला प्रकार; नेमकं काय आहे प्रकरण?
गोरेगावच्या ओबेरॉय मॉलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. केवळ मनसेचा लोगो असलेलं टी शर्ट आणि टोपी घालून आला म्हणून एका मनसैनिकाला मॉलमध्ये प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे मनसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मुंबई : गोरेगावच्या ओबेरॉय मॉलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मनसेच्या एका कार्यकर्त्याने मनसेचा लोगो असलेली टोप आणि टी-शर्ट घातले म्हणून त्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. चक्क मनसेचा लोगो असलेली टोपी घालून येण्यास बंदी करण्यात आल्याने मनसैनिकांचा संतापाचा भडका उडाला आहे. या घटनेनंतर मनसैनिकांनी ओबेरॉय मॉलमध्ये जाऊन सुरक्षा रक्षकांना जाब विचारल्यानंतर सुरक्षा रक्षकांची तंतरली. या सुरक्षा रक्षकांनी मनसेची सपशेल माफी मागितली. त्यामुळे हे प्रकरण निवळले. मात्र, पहिल्यांदाच एखाद्या मॉलमध्ये राजकीय पक्षाचा लोगो असलेली टोपी आणि टी-शर्ट घालून येण्यास मज्जाव करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील ओबेरॉय मॉलमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. या मॉलमधील सुरक्षा रक्षकाच्या मुजोरीचा अनुभव एका मनसैनिकाला आला आहे. डोक्यावर मनसेची टोपी आणि अंगात मनसेचे टी-शर्ट घालून ओबेरॉय मॉलमध्ये प्रवेश करणाऱ्या त्या मनसैनिकाला गेटवरील सुरक्षारक्षकाने मॉलमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली. यामुळे या मनसैनिकाला मोठा अपमान सहन करावा लागला. याचा जाब दिंडोशी विधानसभा विभाग अध्यक्ष भास्कर परब यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी ओबेराय मॉल प्रशासनाला विचारण्यात आला. मनसेचा लोगो असलेली टोपी घालून आल्याने मॉलच्या सुरक्षेत कोणता प्रॉब्लेम होतो? टोपी ही खतरनाक गोष्ट आहे काय? असा संतप्त सवाल मनसैनिकांकडून करण्यात आला.
अखेर माफी मागितली
टोपी आणि टी-शर्टची एवढीच भीती वाटते तर तुमच्या मॉलमध्ये टोप्या आणि टी-शर्ट विक्रीसाठी कशाला ठेवल्या आहेत? असा बिनतोड सवाल मनसैनिकांकडून करण्यात आला. त्यामुळे मॉल प्रशासनाचे धाबे दणाणले. अखेर सुरक्षेची जबाबदारी असलेल्या टॉप सिक्युरिटीकडून मनसैनिकांची माफी मागण्यात आली. यापुढे असला प्रकार होणार नाही याचे लेखी आश्वासनही मनसैनिकांना देण्यात आले. त्यानंतर हा प्रकार निवळला. मनसैनिकांनी पोलिसांनाही याबाबत निवेदन दिलं आहे.
सभेची जय्यत तयारी
दरम्यान, येत्या 22 मार्च रोजी मनसेची जाहीर सभा होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेतून राज ठाकरे कुणाची पिसे काढतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे यांनीही आपण 22 मार्चच्या सभेत सर्व काही बोलणार असल्याचं स्पष्ट केल्याने या सभेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मनसे महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करणार की स्वबळावर लढणार याची घोषणाही राज ठाकरे या सभेत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या राजकीय घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे यांच्या या घोषणेवर राज्यातील आगामी राजकीय समीकरणे कशी असतील हे स्पष्ट होणार आहे.
राज ठाकर यांच्या या सभेची मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. या सभेला राज्यातील कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या सभेच्या माध्यमातून राज ठाकरे शक्तीप्रदर्शन करणार असून निवडणुकीचं बिगूल फुंकणार असल्याचंही सांगितलं जात आहे.