शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर मुंबईत होणाऱ्या पहिल्या निवडणुकीला अचानक रातोरात स्थगिती
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर मुंबईत पहिली महत्त्वाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर देखील झाला होता. पण अचानक आज रातोरात या निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर मुंबईत पहिली महत्त्वाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर देखील झाला होता. पण अचानक आज रातोरात या निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत अतिशय नाट्यमय अशा घडामोडी घडत आहेत. मुंबई विद्यापीठाने रात्री उशिरा परिपत्रक काढून सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुंबई विद्यापीठाकडून 9 ऑगस्टला सिनेट निवडणूक घोषित करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख ही 18 ऑगस्ट होती. तर 10 सप्टेंबरला या निवडणुकीसाठी मतदान होणार होतं. तसेच 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल समोर आला होता. पण निवडणूक जाहीर झाल्यानंतर अवघ्या आठ दिवसांनी मुंबई महापालिकेने या निवडणुकीसा स्थगिती दिली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई विद्यापीठाने आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
या निवडणुकीत मनसे नेते अमित ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आमनेसामने येणार होते. विशेष म्हणजे राज्यातील सत्तांतरानंतर ही मुंबईतील सर्वात मोठी निवडणूक होती. या निवडणुकीत सुशिक्षित, 95 हजार तरुण उमेदवार मतदान करणार होते. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. पण निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशीच ही निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.