‘त्या’ नावावर अद्याप विचार झालेला नाही, पूर्वी अशी प्रथा नव्हती; जयंत पाटलांचा राज्यपालांना टोला
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना राज्यपालांना राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीचं स्मरणही करून दिलं. (ncp leader jayant patil extend birthday wishes to Governor Bhagat Singh Koshyari)
राज्यपाल म्हणून राज्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन त्यापध्दतीने राज्याला मार्गदर्शन करावे, अशा शुभेच्छा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. राज्यपाल नियुक्त 12 उमेदवारांची यादी राज्यपालांकडे आहे. त्यावर विचार झालेला नाही. महाराष्ट्रात यापूर्वी अशी प्रथा नव्हती. परंतु, यावेळी थोडासा विलंब झाला आहे. मात्र आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा वाढदिवस आहे. त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देणं आणि दिर्घायुष्य लाभो अशी अपेक्षा करणं एवढाच माझा आणि त्यांच्या भेटीचा विषय होता, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
राम मंदिराच्या निधीसाठी अराजकीय समिती नेमा
यावेळी त्यांनी राम मंदिराच्या भूखंडाच्या घोटाळ्यावरूनही भाजपला फैलावर घेतलं. राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी देशातील रामभक्तांनी अराजकीय अशी एक समिती तयार करावी, असे आवाहन त्यांनी केलं.
राम भक्तांनी मंदिराचं बघावं
दरम्यान, या समितीने कायम राममंदिर उभारणीतील खर्च, जमाखर्च आणि त्याचा हिशोब हा त्रयस्थ बॉडीने निरीक्षणाखाली ठेवावा. कारण रामभक्तांकडे अपेक्षा आहे की, त्यांनी प्रामाणिकपणे मंदिराचं पावित्र्य राखून राममंदिर उभं करावं. अतिशय भक्तिभावाने राममंदिर उभे व्हावे अशी या देशातील रामभक्तांची इच्छा आहे, म्हणून रामभक्त मोठ्याप्रमाणावर निधी देत आहेत. मात्र राममंदिर उभारणीत गोळा होणार्या निधीत भ्रष्टाचार होत असेल तर हे दुदैव आहे, असं ते म्हणाले.
राम यांच्यापासून किती लांब हे स्पष्ट होतं
राममंदिर बांधताना हे लोक भ्रष्टाचार करत असतील तर राम यांच्यापासून किती लांब आहे आणि रामापासून हे किती लांब आहेत हे स्पष्ट होते. रामाचा फायदा घेऊन कसे वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय फायदे आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत हे यानिमित्ताने समोर आले आहे, अशी जोरदार टीकाही त्यांनी भाजपचं नाव न घेता केली.
अलमट्टीसाठी शनिवारी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
अलमट्टी धरणातून होणार्या पाण्याच्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे या पूरनियंत्रणाचं काम महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल यादृष्टीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी शनिवारी सकाळी 10.30 वाजता बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी यांना घेऊन ही चर्चा होणार आहे. ही थेट चर्चा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी होणार आहे, असं ते म्हणाले.
दोन्ही राज्यांच्या समन्वयातून तोडगा काढणार
कृष्णा नदीचा महापूर आणि त्यातून अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन, महाराष्ट्रातल्या कृष्णा खोऱ्यातील व कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला जे नुकसान सोसावे लागते. त्यापासून कमीत कमी कसं नुकसान होईल आणि पूरनियंत्रणाचं काम दोन्ही राज्यांच्या समन्वयाने कसं चांगलं होईल, यादृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यापूर्वी सचिव स्तरावर बैठक पार पडली आहे आणि आता मंत्री स्तरावर होत आहे. शेजारील राज्याशी संवाद चांगला कसा होईल हा प्रयत्न असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं. (ncp leader jayant patil extend birthday wishes to Governor Bhagat Singh Koshyari)
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 17 June 2021https://t.co/01P77NuPay
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 17, 2021
संबंधित बातम्या:
संकटमोचक ते यशस्वी ‘मध्यस्थ’, नार्वेकरांच्या राजभवनावरील भेटीमुळे राज्यपाल-मुख्यमंत्री कटुता मिटणार?
काँग्रेस स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, जयंत पाटलांचाही राऊतांच्या सुरात सूर
सक्रिय राजकारणात या, आरक्षण समर्थकांनासोबत घ्या; प्रकाश आंबेडकरांचं संभाजीराजेंना आवतन
(ncp leader jayant patil extend birthday wishes to Governor Bhagat Singh Koshyari)