इंडिया आघाडीच्या बैठकीतील आतली बातमी Tv9 च्या हाती, मोठा निर्णय घेण्यात आला?
मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीतील आतली बातमी 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागली आहे. या बैठकीत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईल | 31 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इंडिया आघाडीची आज आणि उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडत आहे. याच बैठकीतील एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीतली आतली बातमी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. इंडिया आघाडीच्या जागावाटपच्या फॉर्म्युल्याबाबत या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. खात्रीलायक सूत्रांनी याबाबत आजच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याविषयी माहिती दिली आहे.
सूत्रांनी याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटप पूर्ण करणार, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ग्रँड हयात हॉटेलमध्ये सध्या अनौपचारिक बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर डिनर डिप्लोमसी होणार आहे. त्यानंतर उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
राज्यनिहाय कमिटी स्थापन होणार
जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी राज्यनिहाय कमिट्या स्थापन करण्यात येणार आहेत. प्रत्येक राज्याच्या समितीनुसार, त्या त्या राज्यात जागावाटप होणार आहे. एकास एक उमेदवार देण्याची रणनीती आहे. सगळ्या पक्षांचा मिळून एक उमेदवार विरुद्ध भाजप आणि एनडीए आघाडीचा उमेदवार अशी लढत झाली तर इंडिया आघाडीचा उमेदवार जिंकण्याची शक्यता जास्त राहील, असा यामागील विचार आहे. त्यामुळे जागावाटप 30 सप्टेंपर्यंत पूर्ण करणं आणि ते जाहीर करणं तसेच प्रचारासाठी योग्य नीती ठरवणं हा सध्या बैठकीतला मुद्दा आहे.
मुदतपूर्व लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता
देशात मुदतपूर्व लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर या पाच दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात एक देश एक निवडणूक हे विधेयक मांडलं जाण्याची चर्चा आहे. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यानंतर देशात सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यात येण्याच्या शक्यता आहे. या निवडणुका डिसेंबर महिन्यात घेतल्या जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विरोधी पक्ष देखील तयारीला लागले आहेत. मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतात. त्याआधीच जागावाटप जाहीर करुन उमेदवार करुन प्रचाराला सुरुवात करणं ही इंडिया आघाडीची रणनीती दिसत आहे.