रामदास आठवलेंनी सांगितला महायुतीचा नवा फॉर्म्युला; शिवसेना नव्हे भाजप नवा फॉर्म्युला स्वीकारणार?
भाजपकडून शिवसेनाला सत्तेची साद घालण्यात येत आहे. मात्र, शिवसेनेकडून भाजपला कोणताही प्रतिसाद देण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजप युतीसाठी नवा फॉर्म्युला दिला आहे.
मुंबई: भाजपकडून शिवसेनाला सत्तेची साद घालण्यात येत आहे. मात्र, शिवसेनेकडून भाजपला कोणताही प्रतिसाद देण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजप युतीसाठी नवा फॉर्म्युला दिला आहे. भाजप-शिवसेनेने युती करावी आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यात यावं, असा फॉर्म्युला आठवले यांनी सूचवला आहे. त्यामुळे भाजप आठवलेंचा हा नवा फॉर्म्युला स्वीकारणार का? असा सवाल केला जात आहे.
रामदास आठवले यांनी दादर शिवजीपार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या स्मृतिस्थळी पुष्पहार अर्पण करून विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी हा फॉर्म्युला दिला. शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थपन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल. त्यासाठी शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपला सत्तेतील 50 टक्के वाटा देऊन पुन्हा शिवशक्ती-भीमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करावे, असा सल्ला आठवले यांनी दिला आहे.
मोदी, शहा, नड्डांना भेटणार
महायुती व्हावी म्हणून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची आपण भेट घेणार आहोत. त्यांना आपला नवा फॉर्म्युला सांगणार असून त्यावर चर्चा करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
बाळासाहेबांच्या स्वप्नासाठी…
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती-भीमशक्ती-भाजप महायुतीची एकजूट उभी केली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला हद्दपार करून भाजप-शिवसेना-आरपीआय शिवशक्ती-भिमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते साकार करण्यासाठी पुन्हा भाजप-शिवसेनेने एकत्र यावे. त्यासाठी शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपला सत्तेतील 50 टक्के सहभाग द्यावा. या पर्यायावर भाजप आणि शिवसेनेने विचार करावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
सरकार कधी येणार विचारू नका
दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचं आवाहन केलं आहे. आपल्याला प्रखर विरोधी पक्षनेते बनायचं आहे. जूनपासून आपण काम करत आहोत. सरकार कधी येणार, देवेंद्रजी कानात तर सांगा… आम्ही कुणाला सांगणार नाही… आता ही चर्चा बंद करा. आपण प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार कामही सुरू केलं असून वेळोवेळी तुम्हाला कार्यक्रमही दिले आहेत, असं पाटील म्हणाले होते.
जयंत पाटलांची टोलेबाजी
चंद्रकांत पाटील यांनी सत्ता कधी येईल हे विचारू नका असं पदाधिकाऱ्यांना बजावलं होतं. त्याची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे. भाजपने आपले मनोगत व्यक्त केले ही चांगली गोष्ट आहे. आता राज्यातील जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडायला सुरुवात करतील, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 17 November 2021https://t.co/tpG6oVWeN8#SuperFastNews100 #SuperFastNews #MarathiBatmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2021
संबंधित बातम्या:
Photo : जमलेल्या माझ्या तमाम… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक झंझावात!
दिल्लीतला मोठा काँग्रेस नेता राष्ट्रवादीच्या गळाला, पवार म्हणतात, आम्हाला आधी घर पक्कं करावं लागेल!