मुसळधार पाऊस खिडकीत उभा राहून… नव्हे, उभी राहून पाहा… राऊतांची जोरदार कविता, पवारांची हसून दाद
कधी रोखठोक बोलण्यातून, कधी धारदार लेखणीतून तर कधी ट्विटवरवरील शायरीतून भाजपची पिसे काढणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊतांनी आज चक्क कवितेतून भाजपवर हल्लाबोल चढवला.
मुंबई: कधी रोखठोक बोलण्यातून, कधी धारदार लेखणीतून तर कधी ट्विटवरवरील शायरीतून भाजपची पिसे काढणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊतांनी आज चक्क कवितेतून भाजपवर हल्लाबोल चढवला. राऊतांच्या या कवितेला संपूर्ण सभागृहाने डोक्यावर घेतलंच, पण खुद्द शरद पवारांनाही मिष्किल हसत या कवितेला दाद दिली. निमित्त होतं, नेमकचि बोलणे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज नेमकचि बोलणे या त्यांच्या भाषण संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार भाषण करत भाजपवर हल्ला चढवला. यावेळी राऊतांनी प्रसिद्ध कवी किशोर कदम यांची कविता सादर करून भाजपला जोरदार टोले लगावले. राऊत यांनी म्हटलेल्या या कवितेला सर्वांनीच हसून दाद दिली.
हशा, टाळ्या आणि खसखस
मुसळधार पाऊस खिडकीत उभा राहून पाहा… खिडकीत उभी राहून पाहा… बघ माझी आठवण येते का? (आता आम्हाला तीन पक्षाला रोज एकमेकांची आठवण येते म्हणून मला ही कविता आठवली) हात लांबव… (आम्ही तिघांनी हात लांबच केलेत एकमेकांसाठी) हात लांबव, तळहातावर झेल पावसाचं पाणी इवलसं तळं पिऊन टाक… बघ माझी आठवण येते का?…
अशी कविता राऊतांनी म्हणताच एकच खसखस पिकली. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून कवितेला प्रतिसाद दिला. तर शरद पवार यांनी हसून या कवितेला दाद दिली.
ते दोन वर्षापासून समजतंय
जे विकृत राजकारण सध्या सुरू आहे त्याच्यावर सुद्धा पवारांनी 25 वर्षापूर्वी त्यांच्या भाषणातून कोरडे ओढले आहेत. भाजपला ऐक्य नकोच आहे. ते त्यांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं. आम्हाला ते दोन वर्षांपूर्वी समजलं, असं राऊत यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. भाजप देशाचे तुकडे करत आहे. भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे. हे पवारांनी 1996मध्ये सांगितलं होतं. ते आता आम्हाला कळू लागलं आहे. हे पुस्तक आपण मोदींना पाठवायला हवं. महाराष्ट्र हा देशाला विचार देत असतो. ‘नेमकची बोलणे’ हे पुस्तक पंतप्रधान मोदींना पाठवायला हवं, असं त्यांनी सांगितलं. या ग्रंथाला भगवा कलर घातला. मी आपला आभारी आहे. अवघा रंग एकची झाला. देशाचा महाराष्ट्राचा रंग भगवा आहे, असं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.
भाजपला ऐक्य नको आहे
मी पवारांना दिल्लीत खुर्ची दिली. त्यावर टीका टिप्पणी होत आहे. मी पवारसाहेबांना खुर्ची का दिली हे समजायचं असेल तर त्यांची 61 भाषणं वाचली पाहिजे. 25 वर्षांपूर्वी त्यांनी सांगितलं भाजपला ऐक्य नको आहे. देश किती मागे चाललाय हे आम्हाला आता कळू लागलं आहे. आज प्रश्न विचारणाऱ्यांची स्थिती काय आहे हे सर्वांना माहीत आहे, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा