‘त्या’ पत्रामुळे चंद्रकांतदादांचेच धोतर सुटले, महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा! किती मनोरंजन कराल?; राऊतांची शेरेबाजी सुरूच
शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील कलगीतुरा अजूनही थांबलेला नाही. दोन्ही नेते एकमेकांवर रोज काही ना काही मिष्किल टीका टिप्पणी करतातच. (Sanjay Raut)
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील कलगीतुरा अजूनही थांबलेला नाही. दोन्ही नेते एकमेकांवर रोज काही ना काही मिष्किल टीका टिप्पणी करतातच. आजही राऊत यांनी चंद्रकांतदादांवर जोरदार हल्ला चढवला आहे. चंद्रकांत पाटलांनी आम्हाला पत्रं लिहिलं, त्यामुळे त्यांचंच धोतर सुटलंय, असं सांगतानाच महाराष्ट्रातील विरोधकांनी हास्यजत्रा करून ठेवली आहे. किती मनोरंजन कराल? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay Raut slams chandrakant patil over his letter)
शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक सदरातून हा सवाल केला आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या रोज सकाळी उठून मंत्र्यांवर नवा आरोप करतात व त्या मंत्र्यांच्या मतदारसंघात दौरे काढतात. सरकारने त्यांचे दौरे रोखू नयेत असे मला वाटते. चंद्रकांत पाटील यांची वेगळीच तऱ्हा आहे. पंतप्रधान मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ‘कोव्हॅक्सिन’ लस घेतली, पण कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली नाही, तरीही मोदी वॉशिंग्टनला उतरले! एकंदरीत सगळीच गंमत आहे, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.
आरोप हे साबणाचे बुडबुडेच
राजकारण्यांकडून विविध पातळ्यांवर मनोरंजन होतच असते. सध्याच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची ‘हास्यजत्रा’च केली आहे. किरीट सोमय्या हे भाजपचे माजी खासदार रोज सकाळी उठून महाविकास आघाडीतील एका मंत्र्यावर आरोप करतात. त्यांचे आरोप हे साबणाचे बुडबुडेच ठरतात. महाराष्ट्राला व देशाला सुसंस्कृत विरोधी पक्षाची परंपरा आहे. दिल्लीत मधू दंडवते, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, कॉ. हिरेन मुखर्जी यांनी काँग्रेस सरकारविरोधात जोरदार मोहिमा राबवल्या. अनेक भ्रष्टाचार उघड केले. इंदिरा गांधी, संजय गांधीही त्यातून सुटले नाहीत. महाराष्ट्रात दत्ता पाटील, मृणाल गोरे, केशवराव धोंडगे, कृष्णराव धुळपांपासून गोपीनाथ मुंडेंपर्यंत अनेक विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला घाम फोडला, पण त्यात आजच्यासारखा विखार नव्हता. शिवाजीराव निलंगेकर, बॅ. अंतुले, विलासराव देशमुख यांनाही विरोधी पक्षाच्या जोरदार हल्ल्यांमुळेच जावे लागले, पण आजच्या विरोधी पक्षाप्रमाणे त्यांच्याकडे ‘हास्यजत्रा’ म्हणून पाहिले जात नव्हते, अशी खोचक टीका त्यांनी केली.
दादांचे धोतर सुटले
‘सामना’तील एका अग्रलेखावर चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली व एक खरमरीत पत्र ‘सामना’स पाठवले. त्यात भूमिका कमी व जळफळाटच जास्त. तरीही ते पत्र ‘सामना’ने जसेच्या तसे छापले. त्या पत्रात पाटील यांनी अनेक ठिकाणी अपमानकारक, अब्रुनुकसानी करणारी विधाने करूनही ते सर्व प्रसिद्ध करण्याचे मोठेपण ‘सामना’ने दाखवले, पण लिहिता, बोलताना भान सुटले की स्वतःच्याच धोतरात लोक कसे पाय अडपून पडतात ते या पत्रावरून दिसते. पत्रकार सुशील सुर्वे यांनी चंद्रकांत पाटलांच्या पत्रातील हास्यजत्रा समोर आणली. त्यामुळे त्यांचेच धोतर सुटले. आता धोतरावर कुणी बोलले म्हणून हिंदू धर्माचा अपमान झाल्याची बोंब भाजप आमदारांकडून ठोकली गेली, पण देशातील अनेक इस्लामी देशातही लुंगीवजा धोतरे वापरली जात आहेत. ते एक वस्त्र आहे. गाय हा ज्याप्रमाणे एक उपयुक्त पशू आहे असे वीर सावरकर सांगून गेले तसे ‘धोतर’, ‘धोती’ हे एक वस्त्रच आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
चंद्रकांतदादांची घोडचूक
चंद्रकांत पाटील यांच्या या उत्तराच्या शेवटून तिसऱ्या परिच्छेदातल्या नवव्या ओळीत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लिहिलं आहे की, ‘शरद पवारांवर कोणी टीका केली की त्यांचे प्रवक्ते असल्यासारखे तुम्ही अंगावर येता. त्यामुळेच तुम्हाला शिवसेनेत कोणी गांभीर्याने घेत नाहीत, असे दिसते.’ पत्रातल्या या संपूर्ण ओळीत संजय राऊतांची शिवसेनेत कशी दखल घेतली जात नाही, त्यांना शिवसेनेत कुणी किंमत देत नाही याकडे चंद्रकांतदादांनी लक्ष वेधलं आहे, पण पत्रातल्या अगदी याच ओळीला लागून असलेल्या ओळीत हेच चंद्रकांतदादा लिहितात की, तुमच्या मध्यस्थीने आणि पुढाकाराने शिवसेनेने भाजपसोबतची विजयी युती तोडली आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्ता मिळवली.
चंद्रकांतदादा आधीच्या ओळीत म्हणतात की, संजय राऊत यांना शिवसेनेत कुणी गांभीर्याने घेत नाहीत, पण पुढच्याच ओळीत शिवसेना-भाजप युती तोडण्यात संजय राऊत यांची मध्यस्थी आणि पुढाकार होता असे म्हणत असतील तर संजय राऊत यांना शिवसेनेत केवळ गांभीर्यपूर्वक घेतलं जात नाही, तर शिवसेनेच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचा गंभीर सहभाग असतो असा त्याचा अर्थ होतो. एकाच परिच्छेदात चंद्रकांतदादांच्या उत्तरातला हा विरोधाभास त्यांच्या पक्षातल्या लिखाणनैपुण्याला आणि शब्दचातुर्यालाही छेद देणारा आहे, अशी (दिसून येणारी) घोडचूक एका भाजप नेत्याने करणं हे बरं नव्हं!”, असंही रोखठोकमध्ये म्हटलं आहे. (Sanjay Raut slams chandrakant patil over his letter)
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 26 September 2021 https://t.co/wMZJasE8iD #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 26, 2021
संबंधित बातम्या:
भाजपचा पुण्यात फिरकू न देण्याचा इशारा, संजय राऊत थेट वडगाव शेरीत मेळावा घेणार, नेमकं काय घडणार?
(Sanjay Raut slams chandrakant patil over his letter)