तुम्ही अजितदादांचे विरोधक आहात का?, झाली दादांकडून चूक; सुधीर मुनगंटीवारांचे नवाब मलिकांना चिमटे कशासाठी?
मुस्लिम आरक्षण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच जुंपली.
मुंबई: मुस्लिम आरक्षण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच जुंपली. तुम्ही अजितदादांचे विरोधक आहात का? झाली अजितदादांकडून चूक, असा चिमटाच सुधीर मुनगंटीवार यांनी नवाब मलिक यांना लगावला.
समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी आणि रईस शेख यांनी सभागृहात बॅनर घेऊनच प्रवेश केला. मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याबाबत त्या बॅनरवर लिहिलं होतं. यावेळी आझमी यांनी मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. मुस्लिम आरक्षणावर सभागृहात चर्चा का होत नाही? असा सवाल अबु आझमी यांनी केला. यावेळी काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनीही मुस्लिम आरक्षणाची बाजू लावून धरली. नारायण राणे समितीने मुस्लिमांना आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे मुस्लिमांना आरक्षण दिलंच पाहिजे, असं पटेल म्हणाले.
म्हणून अंमलबजावणी करू शकत नाही
त्याला राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर दिलं. मुस्लिम आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला आहे. पण प्रकरण हायकोर्टात गेलं आहे. कोर्ट जे सांगेल त्याची आम्ही अंमलबजावणी करू असं सांगतानाच 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नाही. केंद्राने जर मर्यादा वाढवली तर आरक्षण वाढवून देता येईल, असं ते म्हणाले.
फडणवीस-मलिकांमध्ये जुंपली
मलिक यांच्या या स्पष्टीकरणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांचं थेट अभिनंदनच केलं. मुस्लिमांना आरक्षण देता येत नाही हे मलिक यांनी कबूल केलं आहे. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. राजाला पोपट मेला कसा हे सांगता येत नाही. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने सांगितलं जात आहे, असा टोला फडणवीस यांनी मलिकांना लगावला. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. आमचा अशा प्रकारच्या आरक्षणाला विरोध राहील, असंही ते म्हणाले. फडणवीस यांच्या या विधानावर मलिक यांनी आक्षेप घेतला. फडणवीस सभागृहाची दिशाभूल करत आहेत. हा धर्माच्या आधारे आरक्षण देण्याचा मुद्दा नाही. 50 टक्क्यांची अट शिथील होत नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्नही असाच सुटला नाही, असं मलिक यांनी सांगितलं.
रात्रीचे उद्योग करत नाही
मलिक यांनी उत्तर दिल्यानंतर सुधीर मुनगंटीवार बोलायला उभे राहिले. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथेवरून मलिकांना चिमटे काढले. अल्पसंख्याक मंत्र्यांना आरक्षण देता आलं असतं तर त्यांनी रात्रीच फाईल काढली असती, असं मुनगंटीवार म्हणाले. त्यावर मलिक यांनी तात्काळ उत्तर दिले. आम्ही रात्रीचे उद्योग करत नाही, असं मलिक म्हणाले. त्यावर, तुम्ही अजित पवारांबद्दल बोलतात का? तुम्ही अजित पवारांचे विरोधक आहात का? झाली एकदा अजितदादाकडून चूक, असा चिमटा मुनगंटीवार यांनी लगावला.
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 | 23 December 2021#Fastnews #news https://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/UDVQe7JSOL
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 23, 2021
संबंधित बातम्या:
ओबीसींसाठी वंचितची विधानभवनावर धडक, कार्यकर्त्यांची धरपकड, आंबेडकर आक्रमक, म्हणाले…
आदित्य ठाकरेंना धमकी, मी स्वत: कर्नाटकात जातो, फडणवीसांचा शब्द, रजा अकादमी, सनातनवरही मोठं वक्तव्य
भेटीत तृष्टता मोठी…कालच्या वादावादीनंतर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगल्या गुजगोष्टी…!