तर निवडणूक आयोगावर खटला भरू, उद्धव ठाकरे यांचा थेट निवडणूक आयोगालाच इशारा; का दिला इशारा?
जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात फैसला होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असं आमचं म्हणणं होतं. आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत. शिंदे गटच घराच्या बाहेर गेला आहे.
विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना भवन, शिवसेना शाखा आणि शिवसेनेचा पक्षनिधीवर शिंदे गट दावा करण्याची जोरदार चर्चा आहे. निवडणूक आयोग शिंदे गटाला शिवसेनेचा 150 कोटींचा निधी वापरण्याची परवानगी देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या सर्व चर्चांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्षनिधीचा दावा ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. पक्ष निधी असो की शिवसेनेच्या मालमत्ता त्यावर निवडणूक आयोग निर्णय देऊ शकत नाही. तसे केल्यास निवडणूक आयोगावर खटला भरू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
शिवसेना भवन शिंदे गटाच्या ताब्यात जाणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. त्यामुळे असंख्य शिवसैनिक शिवसेना भवनावर जमले. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेही शिवसेना भवनावर पोहोचले. यावेळी त्यांनी शिवसैनिक, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशीही संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला आहे.
पक्षनिधीचा दावा ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाा नाही. तसं केल्यास निवडणूक आयोगावर केस केली जाईल. खटला भरला जाईल. कुणाच्या निधीवर दरोडा टाकण्याचा अधिकार आयोगाला नाही. त्यांना फक्त चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्याचा अधिकार आहे. निवडणुका घेण्याचा अधिकार आहे. पक्षांतर्गत आणि देशांतर्गत लोकशाही जिवंत आहे की नाही हे पाहण्याचा अधिकार आहे. प्रॉपर्टी आणि इतर मालमत्तांवर हक्क सांगण्याची परवानगी देण्याचा अधिकार नाही. निवडणूक आयोगाने तसं केल्यास आम्ही निवडणूक आयोगावर केस दाखल करू. निवडणूक आयोग म्हणजे सुल्तान नाही, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
राजकीय पक्षांना संपवण्याचा कट
राजकीय पक्षांना संपवण्याचे षडयंत्र सुरू आहे. हे प्रकरण आता देशभर पेटेल. आज एका पक्षावर वेळ आणल्यावर उद्या दुसरे पक्षही संपवतील की काय ही भीती आहे. इंग्रजांच्या राजवटीनंतर देशात लोकशाही फक्त 75 वर्ष होती का? असा सवाल भावी पिढी विचारेल, असं ते म्हणाले.
आयोग बरखास्त करा
निवडणूक आयोग बरखास्त करा. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाहीये. ईव्हीएमवर यापूर्वी आम्ही अविश्वास दाखवला होताच. निवडणूक आयोगावर आमचा विश्वास नसल्याने आता जी काही सुनावणी असेल ती सर्वोच्च न्यायालयात झाली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
व्हीप लागू होणार नाही
शिंदे गटाचा आमच्या आमदारांना व्हीप लागू होणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. आम्हाला व्हीप लागू होणार नाही. आमच्यात वाद सुरू झाला. तेव्हा आयोगाने दोन गट मान्य केले. दोन्ही गटांना चिन्ह आणि नाव दिले. त्यामुळे आमच्या गटाचं वेगळं अस्तित्व मान्य करण्यात आल्याने आम्हाला व्हीप लागू होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आम्ही जिथे होतो, तिथेच आहोत
जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात फैसला होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असं आमचं म्हणणं होतं. आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत. शिंदे गटच घराच्या बाहेर गेला आहे. त्यामुळे ते डिस्क्वॉलिफाय होण्याची शक्यता अधिक आहे. आम्हाला काही भीती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.