Nashik CNG Rates: नाशिककरांच्या खिशाला कात्री; सीएनजी दरांत पुन्हा 3 रुपयांनी वाढ
सीएनजीमध्ये झालेल्या दरवाढीमुळे आता नाशिककरांच्या खिशाला कात्री लागणार असून, सीनजीच्या भावात वाढ सुरूच असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक (Nashik) शहरात मध्यरात्रीपासून सीएनजीचे (CNG) दर प्रतिकिलो तीन रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिककरांना आता एक किलो सीएनजीसाठी 89 रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या महिन्यातच सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता महिन्याभरात झालेली ही दुसरी वाढ आहे. सीएनजीधारकांना या दरवाढीचा चांगलाच फटका बसतोय. सोमवारी मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. याआधी सीएनजीचा दर प्रतिकिलो 86 रुपये इतका होता. सीएनजीमध्ये झालेल्या दरवाढीमुळे आता नाशिककरांच्या खिशाला कात्री लागणार असून, सीनजीच्या भावात वाढ सुरूच असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सीएनजी, पीएनजी, एलपीजी, पेट्रोल, डिझेल अशा सर्वच प्रकारच्या इंधनामध्ये वाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला आहे. (CNG Price Hike)
सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सीएनजी, पीएनजीवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा देखील केली होती. सीएनजीवर व्हॅट कपात करण्यात आल्याने सीएनजीचे दर सहा रुपयांनी तर पीएनजीचे दर साडेतीन रुपयांनी स्वस्त झाले होते. सीएनजी स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा सीएनजीच्या दरात वाढ झाली.
गेल्या दीड महिन्यात नाशिकमध्ये सीएनजीचे दर प्रतिकिलो 18 रुपयांनी वाढले. शहरात पूर्वी सीएनजीचे दर प्रति किलो 83 रुपये इतके होते. त्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हेच दर तीन रुपयांनी वाढून 86 रुपयांवर पोहोचले. आता एक किलो सीएनजीसाठी 89 रुपये मोजावे लागणार आहेत.