पोरी गेल्या कुठं? सोलापुरात का होताहेत महिला आणि मुली अचानक गायब?; घरातून गेल्या त्या आल्याच नाहीत?
सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून एक धक्कादायक प्रकार घडत आहे. जिल्ह्यातून अचानक महिला आणि मुली गायब होत आहेत. तब्बल 500 महिला आणि मुली तर अजूनही सापडलेल्या नाही. गेल्या 15 महिन्यांपासून हा प्रकार घडत आहे.
सोलापूर : सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी आहे. सोलापुरातून गेल्या 15 महिन्यात दोनचार नव्हे तर तब्बल 2352 महिला आणि तरुणी गायब झाल्या होत्या. त्यातील 546 महिला अजूनही बेपत्ता आहेत. त्या अजूनही सापडलेल्या नाहीत. या मुली आणि महिला घरातून बाहेर पडल्या. त्या परत आल्याच नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला आणि मुली गायब होत असल्याने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामागे काही काळंबेरं तर नाही ना? अशी शंकाही या निमित्ताने घेतली जात आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या 15 महिन्यांमध्ये एकूण 2352 महिला आणि मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील सोलापूर जिल्ह्यातील 546 महिला आणि मुली अजूनही बेपत्ता आहेत. या महिला आणि मुलींचा शोध लागलेला नाही. त्या कुठे गेल्या कुणालाच माहीत नाही. का गेल्या? हेही कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे या मुली आणि महिलांच्या घरच्यांनाही माहीत नाही. बघता बघता घरातल्या मुली आणि महिला बाहेर पडतात आणि परत येतच नसल्याने सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात असं का घडतंय? याचा थांपत्ताही ग्रामस्थांना कळायला मार्ग नाहीये.
मुली घर सोडण्याचं प्रमाण वाढलं
सोलापूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातून अल्पवयीन मुली, महिला आणि तरुणी बेपत्ता होत असल्याचं, घर सोडून निघून जात असल्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. जानेवारी 2022 ते मार्च 2023 या 15 महिन्यांत सोलापूर शहरातील 107 अल्पवयीन मुली तर 487 तरुणी, महिला बेपत्ता झाल्याची पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. दुसरीकडे ग्रामीणमधील 1250 मुली, महिला बेपत्ता झाल्या. त्यातील तब्बल 546 मुली, महिला, तरुणी अजूनही सापडलेल्या नाहीत. या मुली आणि महिलांचा शोध घेण्याचा पोलीस कसून प्रयत्न करत आहेत.
ही आहेत गायब होण्याची कारणे
कोरोनाच्या संकटानंतर विवाहातील मानपान, पतीसह सासरच्यांकडून होणारा छळ, विवाहबाह्य संबंध, प्रियकराकडून लग्नाचं अमिष, महागाई वाढली, नवऱ्याची नोकरी गेली, आर्थिक चणचण वाढली, वय वाढल्यानंतही लग्न होत नाही, हुंडा पुरेसा दिला नाही म्हणून कौटुंबिक छळाच्या घटना वाढल्या आहेत. प्रेम प्रकरण, कौटुंबीक कलह, आर्थिक अडचणी तसेच सोशल मीडियाचा अतिवापर आदी कारणांमुळे या महिला आणि मुली घरातून गायब होत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, यामागे हीच कारणं आहेत की आणखी काही याचाही पोलीस शोध घेत आहेत.