अजित पवार, जयंत पाटील यांच्या सोलापूर दौऱ्याआधीच राष्ट्रवादीला मोठं खिंडार; अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, त्यांच्या सोलापूर दौऱ्यापूर्वीच राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीचे सोलापुरातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात आले आहेत.
सोलापूर : महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. राष्ट्रवादीने यापूर्वीच महाराष्ट्र पिंजून काढला आहे. अजूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. स्वत: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेत आहेत. आता अजित पवार आणि जयंत पाटील सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोलापूर दौऱ्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यसनमुक्ती सेलचे शहराध्यक्ष ज्योतिबा गुंड, शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष गणेश छत्रबंद यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी दक्षिण विधानसभा उपाध्यक्ष, व्यसनमुक्ती सेलचे सरचिटणीस, शहर चिटणीस यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. तर शिंदे गटाची ताकद दिवसे न् दिवस बळकट होताना दिसत आहे.
सहा महिन्यांपासून गळती
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. मागील सहा महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शहरात मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आज अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापूर दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या दौऱ्याआधीच संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिट्टी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
शिंदे गट मजबूत
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गेल्या काही महिन्यांपासून मजबूत होताना दिसत आहे. इतर पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्याऐवजी शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या प्रचंड घटली आहे. शिंदे गटात खास करून ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतून येणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्याांची संख्या अधिक आहे. त्यातुलनेत काँग्रेसला फारशी झळ बसलेली नाही.