जे भाजपात गेले, ते आठवड्याभरात परत आले, जयंत पाटील सोलापुरात येताच जादूची कांडी फिरली; नेमकं काय घडलं?
शिंदे गट आणि भाजपमध्ये आमचे पदाधिकारी तात्पुरते गेले आहेत. भाजप-शिंदे गटाची सत्ता आहे. त्यामुळे हे पदाधिकारी तिकडे गेले आहेत. त्यांची काही काम आहे. ती झाल्यावर परत येतील.
सोलापूर : जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. तसतसं सर्वच राजकीय पक्षात आयाराम गयारामची येजा सुरू झाली आहे. या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते त्या पक्षात जात आहेत. तर त्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते या पक्षात येताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील काही पदााधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीसाठी हा मोठा फटका असल्याचं मानलं जात होतं. मात्र, काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापुरात येताच जादूची कांडी फिरली. भाजपमध्ये गेलेले कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीत आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठवड्याभरापूर्वी राष्ट्रवादीच्या असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र काल जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नव उत्साह संचारला आहे.
पुन्हा प्रवेश
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 25 मे रोजी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या व्हिजेएनटी सेलचे शहराध्यक्ष रुपेश भोसले यांनी पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत चांगलीच खळबळ उडाली होती. त्याची दखल स्वत: जयंत पाटील यांनी घेतली. पाटील हे काल सोलापूर दौऱ्यावर आले. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनीही पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या खेळामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीय.
पाटील यांचं सूचक विधान
जयंत पाटील यांच्या सोलापूर दौऱ्याच्या आदल्या दिवशीही काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. सोलापुरात आल्यावर जयंत पाटील यांना याबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सूचक विधान केलं होतं. शिंदे गट आणि भाजपमध्ये आमचे पदाधिकारी तात्पुरते गेले आहेत. भाजप-शिंदे गटाची सत्ता आहे. त्यामुळे हे पदाधिकारी तिकडे गेले आहेत. त्यांची काही काम आहे. ती झाल्यावर परत येतील. आम्ही तिकडे जातोय. आमच्या भागाची कामे करायची आहेत. आमच्या भागात विकास निधी आणायचा आहे. म्हणूनच आम्ही भाजप आणि शिंदे गटात जात असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा पाटील यांनी केला होता. पाटील यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.