पुणे, वरळीनंतर आज राज्यातील ‘या’ शहरात बंद; पोलिसांचा जागोजागी बंदोबस्त; भाजप, मनसे, शिंदे गटाची भूमिका काय?
या बंदमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांनी भाग घेण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सोलापुरातील शाळा, महाविद्यालये आज बंद आहेत.
सोलापूर: महापुरुषांचा अवमान होत असल्याने त्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी मोर्चे निघत असून निदर्शनेही होत आहे. महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ पुणे बंद पुकारण्यात आला होता. त्यानंतर काल मुंबईतील वरळीतही कडकडीत बंद पुकारण्यात आला. आज सोलापूरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. श्री. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने या बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये भाजप, मनसे आणि शिंदे गट वगळून सर्वच राजकीय संघटना आणि छोट्यामोठ्या संघटना सहभागी होणार आहेत.
श्री. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने आज पुकारलेल्या सोलापूर बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटासह विविध संघटना सहभागी होणार आहेत. तर भाजपा, मनसे आणि शिंदे गटाचा सोलापूर बंदमध्ये सहभाग असणार नाही. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाकडून जिल्ह्याती तगडा बोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शहरामध्ये 9 पोलीस निरीक्षक, 27 सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक तसेच 154 कर्मचारी, राखीव पोलीस दलाच्या 4 टीम, 9 स्ट्राईकिंग फोर्स तैनात करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने शहराला छावणीचं स्वरुप आलं आहे. सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून बंदला होणार सुरवात होणार आहे.
या बंदमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांनी भाग घेण्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सोलापुरातील शाळा, महाविद्यालये आज बंद आहेत. तर, बाजारपेठही बंद आहेत. 9 वाजता बंदला सुरुवात होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.
मात्र, शहरात सकाळपासूनच बंदला सुरुवात झाली असून शहरात शुकशुकाट जाणवायला सुरुवात झाली आहे. शहरात वाहतूकही तुरळक प्रमाणात सुरू असल्याचं चित्रं आहे. तर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवलेली दिसत आहेत.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी करावी या मागणीसह महापुरुषांबद्दल भाजप नेत्यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल सोलापूरच्या माढा शहरातही आज बंद पुकारण्यात येत आहे. बहुजन समाजाच्या वतीने या बंदची हाक देण्यात आली आहे. बंद दरम्यान दुकाने उघडी ठेवल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.