VIDEO: अजितदादा म्हणतात, Rohit Patil जमिनीवरचा नेता, आरआर आबांचं ब्लड त्याच्यात आहे!
सर्व पक्ष एकीकडे आणि दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील एका बाजूला असं चित्रं कवठेमहाकाळ नगरपंचायतीत होतं. तरीही रोहित पाटील यांनी ही नगरपंचायत खेचून आणली आहे.
पुणे: सर्व पक्ष एकीकडे आणि दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील एका बाजूला असं चित्रं कवठेमहाकाळ नगरपंचायतीत होतं. तरीही रोहित पाटील यांनी ही नगरपंचायत खेचून आणली आहे. रोहित यांच्या या दणदणीत विजयावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आरआर आबांचं ब्लड रोहितमध्ये आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. काही निवडणुकांचे निकाल पाहता साधारण ज्या भागात तरुण नेतृत्व आहे त्यावर लोक विश्वास टाकतात. कर्जत-जामखेडला मागच्या पाच वर्षात आमचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. उमेदवारही मिळत नव्हता. तिथे रोहित पवारांनी क्लिअर मेजॉरिटी आणली आहे. कवठेमहाकाळमध्ये सगळे एकीकडे आणि रोहित एकीकडे होता. रोहित विरुद्ध सर्व अशी लढाई होती. रोहितचं वक्तृत्व चांगलं आहे. त्याची कामाची पद्धत चांगली आहे. जमिनीवरचा नेता आहे. लोकांशी मिसळून वागतो. आर आर पाटलांचं ब्लड त्याच्यात आहे. मनमिळावू स्वभाव आहे. त्यामुळे त्याच्यावर लोकांनी विश्वास टाकला. आता त्याने विकासकामे करावीत. त्याच्या प्रत्येक कामात आम्ही त्याला सहकार्य करू, असं अजित पवार म्हणाले.
निकालाचा आढावा घेणार
एकूण नगरपंचायत निवडणूक निकालावरही अजित पवारांनी भाष्य केलं. आघाडी म्हणून पॅनेल करून नगरपंचायतीत लढलो नव्हतो. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करण्याबाबतचा अधिकार जिल्हास्तरावर दिला होता. प्रत्येकाने जिल्हास्तरावर शिवसेना आणि काँग्रेसने मुभा दिली होती. तुम्ही दोघे एकत्र येऊन समोरच्याचा पराभव करू शकता तर दोघं एकत्रं या, तिघं पराभव करू शकत असाल तर तिघे एकत्रं या, स्वतंत्र लढून जास्त जागा निवडून येत असेल तर स्वतंत्र लढा अशा सर्व प्रकारच्या मुभा दिल्या होत्या. त्यामुळे असंच लढलं पाहिजे, अशीच आघाडी केली पाहिजे अशी बंधनं घातली नव्हती, असं सांगतानाच उद्या कॅबिनेट आहे. त्यात निकालाचा आढावा घेऊ. आघाडीला फटका बसणार नाही यासाठी काय केलं पाहिजे यावर चर्चा करू, असंही ते म्हणाले.
तर मार्ग निघू शकतो
एखाद्या निवडणुकीवर तीन पक्ष मिळून जेव्हा चर्चा करतो तेव्हा काही पक्षांकडून जागांची अवास्तव मागणी होते. एखादा पक्ष एखाद्या ठिकाणी कमकुवत असतो तरी तो अधिक जागा मागतो. तिन्ही पक्षांनी त्यासाठी समंजस भूमिका घेऊन ज्या पक्षाची अधिक ताकद असेल त्या ठिकाणी त्या पक्षाला जास्त जागा दिल्या पाहिजे. कमकुवत पक्षांना कमी जागा दिल्या पाहिजे. काही ठिकाणी राष्ट्रवादी, तर काही ठिकाणी काँग्रेस आणि काही ठिकाणी शिवसेना कमकुवत आहे. त्यानुसार जागा वाटपावर तोडगा निघाला पाहिजे, तिन्ही पक्षांनी दोन पावलं मागे सरकून भूमिका घेतली तर त्यातून मार्ग निघू शकतो, असंही ते म्हणाले.
रोहित लोकांमधील युवा कार्यकर्ता
आमदार रोहित पवार यांनीही रोहित पाटील यांचं कौतुक केलं आहे. रोहित पाटील हा लोकांमधील युवा कार्यकर्ता आहे. त्यांच्यावर लोकांनी विश्वास टाकला, असं सांगतानाच महाविकास आघाडीचा विचार हा स्थानिक पातळीवर होण्याची गरज आहे, असं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं. तसेच कर्जतमध्ये लोकशाहीचा विजय झाला. पराभव दिसत असल्याने दडपशाहीचा आरोप केला जातो, असा टोला त्यांनी भाजपचे नेते राम शिंदे यांना लगावला.
तरुणांनी रोहितचा आदर्श घ्यावा
माजी खासदार राजू शेट्टी यांनीही रोहित यांचे अभिनंदन केले आहे. सगळे विरोधात असताना रोहित लढला. इतर भागातील तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा. प्रस्थापितांना आपण धक्का देऊ शकतो. ती आपल्यात ताकद आहे. क्षमता आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, असं शेट्टी म्हणाले.
संबंधित बातम्या: