PDCC Bank Election: एका जागेचं वाईट वाटतंय, पुणे जिल्हा बँकेच्या विजयावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सातपैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला असून भाजपचा विजय झाला आहे.
पुणे: पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या सातपैकी सहा जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. तर एका जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झाला असून भाजपचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे ज्या जागेसाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड थोपाटले होते, त्याच जागेवर राष्ट्रवादीला हार पत्करावी लागली आहे. अजित पवार यांना हा पराभव जिव्हारी लागला असून एका जागेचं वाईट वाटतंय, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी या निकालावर व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतील एका जागेवर झालेल्या पराभवावर ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडून आलेल्यांचं स्वागत करतो. एका ठिकाणी का आम्ही कमी पडलो याची बारकाईने माहिती घेतो. या जागेबाबत मला डाऊट होताच. तिथे 11 मते कमी पडली. पण बारामतीत आम्हाला चांगला लीड मिळाला आहे, असं अजितदादा म्हणाले. तसेच मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबई जिल्हा बँक निवडणूक ही एक पक्ष म्हणून निवडणूक नव्हती, पक्ष विरहित निवडणूक होती. पक्षाला बाजूला ठेवून त्यांनी निर्णय घेतला, असंही त्यांनी सांगितलं.
आढळरावांचा गैरसमज दूर केला असता
आढळराव पाटलांनी माझ्याशी चर्चा केली असती तर मी त्यांच्याशी बोललो असतो, काही गैरसमज असतील तर दूर केले असते, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
मला काय विचारता?
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. जितेंद्र आव्हाडांनी काय म्हटलं किंवा महाराष्ट्रात कुणी काही म्हटलं त्यावर मला का विचारता? असा सवालच त्यांनी केला.
पराभव का जिव्हारी लागला?
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा पराभव केला आहे. सुरेश घुले यांचा 14 मतांनी पराभव झाला. अजित पवारांनी प्रचार सभेत कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, नेमकी तीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरल्याने अजितदादांना हा पराभव जिव्हारी लागला आहे.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/7JwexyS5J0#BreakingNews | #LiveUpdates | #Corona | #Omicron |
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 4, 2022
संबंधित बातम्या: